पावसाळ्यात पर्यटकांना खबरदारीचे आवाहन
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील मोर्बे धरण परिसरात पावसाची सुरुवात झाली असून, अद्याप धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसले तरी पावसाचा जोर वाढल्यानंतर येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरवर्षी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर कुटुंबासह तसेच मित्रमंडळीसोबत अनेक जण येथे पर्यटनासाठी येत असतात.
यंदा कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी धरण परिसरात सुरू असलेल्या दुरुस्ती कामांतर्गत गळती (लिकेज) दुरुस्ती, संरक्षक लोखंडी जाळ्या आणि रेलिंग बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच धोकादायक भागात प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
पावसाळ्यात नागरिकांनी पाण्यात उतरू नये व सुरक्षिततेचे नियम पाळावेत, यासाठी पोलिसांकडून जनजागृतीचे फलक लावण्यात येणार असून शनिवार व रविवार विशेष बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. संबंधित यंत्रणांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित पर्यटन करण्याचे आवाहन केले आहे.
