मुलांच्या ताटातील घास गायब

शिक्षण विभागाच्या कारभारावर संताप


|आंबेत | गणेश म्हाप्रळकर|

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले, तरी जिल्ह्यातील 2 हजार 453 शाळांपैकी एकाही शाळेला पोषण आहारासाठी लागणाऱ्या धान्याचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे 82 हजार 930 विद्यार्थ्यांच्या पोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांना लोकवर्गणीतून धान्य खरेदी करून विद्यार्थ्यांना जेवण देण्याची वेळ आली आहे.

पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना तांदूळ, मुगडाळ, तूरडाळ, वाटाणा, सोयाबीन वडी, मसाले आदी साहित्य पुरविणे अपेक्षित आहे. मात्र, मार्च महिन्यानंतर जिल्ह्यातील शाळांना एकदाही साहित्य मिळाले नसल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून धान्य गोळा करून विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू ठेवला आहे, तर काही ठिकाणी दुकानदारांकडून उधारीवर साहित्य आणण्याची वेळ आली आहे.

विशेष म्हणजे, या गंभीर प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. एकीकडे विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असताना विद्यार्थ्यांच्या मूलभूत पोषण आहारासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

मुलांच्या जेवणासाठी आम्हालाच खिशाला कात्री लावावी लागते
पोषण आहाराचे साहित्य मिळत नसल्याने आम्हाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचा आहार खंडित होऊ नये म्हणून शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून धान्य खरेदी करत आहेत. शासनाने तातडीने साहित्य उपलब्ध करून द्यावे.

पालक प्रतिनिधी

मार्च महिन्यात शेवटचा पोषण आहार मिळाला. त्यानंतर आजतागायत कोणतेही साहित्य आलेले नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून जमा केलेल्या धान्यावर काटकसर करत विद्यार्थ्यांचा पोषण आहार सुरू ठेवत आहोत.

अतिश भाटकर,
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, खरसई


पोषण आहाराबाबत तालुका स्तरावरून जिल्हा शिक्षण विभागाकडे तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप साहित्याचा पुरवठा झालेला नाही. कोणताही विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये, अशा सूचना सर्व शाळांना दिल्या आहेत.

नवनाथ साबळे,
गटशिक्षणाधिकारी, म्हसळा


पोषण आहार पुरवठ्यात नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, याची तातडीने माहिती घेणार आहे. हा प्रश्न जिल्हा परिषद सभागृहात उपस्थित करून संबंधित अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

बबन मनवे,
सभापती, पंचायत समिती, म्हसळा
Exit mobile version