माजी आमदार बच्चू कडू यांचा घणाघात; रायगडाच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
| महाड | प्रतिनिधी |
प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्यावतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून (दि. 21) दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे. यावेळी बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दात टीका करत सरकार या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि दिव्यांगांना मारण्याचे काम करत आहे, असे स्पष्ट केले.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकर्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र, सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण, कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.
कडू पुढे म्हणाले, सर्वत्र महागाई वाढलेली असून, दिव्यांगांना मागील चार महिन्यांपासून कोणतेही मानधन मिळत नाही. शेतकर्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन 1400 कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी 1200 कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे. श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे. औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार आहे. त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते. याबाबत त्यांना खरेतर शरम वाटली पाहिजे. परंतु, त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचेच राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा घणाघात कडू यांनी केला.