| मुंबई | प्रतिनिधी |
“लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईचा लोकल प्रवास आता आणखी गारेगार आणि सुखकारक होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने वातानुकूलित म्हणजेच एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवण्याचा प्लान केला आहे. केंद्र सरकारने 238 नवीन एसी लोकल गाड्यांच्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संसदेमध्ये मुंबईच्या लोकल प्रवासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. वर्षा गायकवाड यांनी मुंबई लोकल प्रवासाचे वास्तव संसदेत सांगितले. यावेळी त्यांनी विरार- चर्चगेट आणि कल्याण -सीएसएमटी प्रवास करण्याचे आवाहन केले. त्याचसोबत लोकल प्रवासादरम्यान 2468 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि 2697 जण जखमी झाले, असल्याची माहिती देखील त्यांनी संसदेत सांगितली. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना मुंबईत 238 नव्या एसी लोकल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती दिली.
मुंबईत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर 109 एसी लोकल धावतात. या गाड्या आठवड्याच्या दिवशी आणि आठवड्याच्या शेवटी 65 सेवा चालवतात. तर उपनगरीय मार्गांवर अलीकडेच 13 नवीन एसी लोकल सेवांचा समावेश करण्यात आला आहे. हा विस्तार एकूण सेवा सुधारण्यासाठी आणि अधिक आरामदायी प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबईत सध्या 3500 लोकल सेवा सुरू आहेत. रेल्वेकडून येत्या काळात आणखी 300 लोकल सेवा सुरू होणार आहेत. त्यासाठी 17,107 कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये 1.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.