नेरळ ग्रामपंचायतीचे कामगार आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतीमधील 80हून अधिक कामगार मासिक वेतन मिळत नाही म्हणून आंदोलन करीत आहेत. सफाई, पाणीपुरवठा आणि वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले थकित वेतन मिळावे यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, त्या सर्व कामगारांना त्यांचे थकित वेतन मिळावे यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
नेरळ ग्रामपंचायतीमधील कामगारांना नऊ महिने वेतन मिळाले नाही. त्याचवेळी भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरली जात नाही. कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत, त्यामुळे कामगारांनी आपल्या युनियनमार्फत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आझाद हिंद समाज पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कामगारांना त्यांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी मनसेचे युनियन शंभर टक्के ठामपणे पाठीशी उभी राहील, असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी कामबंद आंदोलनात सहभागी असलेल्या कामगार वर्गाशी चर्चा केली. शेकापचे तालुका चिटणीस श्रीराम राणे आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र हजारे यांनी आ. जयंत पाटील कामगारांना तात्काळ वेतन मिळावे यासाठी प्रयत्नशील असून, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत बैठक करणार आहेत, अशी माहिती दिली. त्यावेळी नेरळ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तालुका अध्यक्ष संजय गवळी आणि नेरळ शहर अध्यक्ष नंदू मोडक यांनी कामबंद आंदोलनाला आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला. युनियन अध्यक्ष सुभाष नाईक आणि अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत.त्याचवेळी सफाई विभागमधील 40 आणि पाणी पुरवठा तसेच वीज विभागातील 45 असे 85 कामगार आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत.
आंदोलनामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर नेरळ बाजारपेठेमध्ये दररोज सकाळी आणि रात्री स्वच्छता केली जाते. तसेच परिसरातदेखील स्वच्छता दररोज केली जाते. मात्र, कामबंद आंदोलन सुरू झाल्यापासून प्रामुख्याने कचरा उचलण्याचे बंद झाले आहे. त्यामुळे कचराकुंड्या या कचऱ्याने भरून गेल्या आहेत, तर जागोजागी कचरा साठून आल्याचे दिसून येत आहे.
