। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावामध्ये एक परप्रांतीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचे बळजबरीने लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे. वाळवटी चाळीमध्ये राहणार्या एका महिलेने या मुलीला कामासाठी बाहेरगावी घेऊन जाते, असे सांगून माणगाव येथे आणले होते. सदर स्त्रीने तिला माणगाव येथे आपल्या बहिणीच्या घरी पाच सहा दिवस ठेवून घेतले. ही मुलगी 24 ऑक्टोबर रोजी वाळवटी गावातून बेपत्ता झाली होती. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती.
दरम्यानच्या काळामध्ये पीडित मुलीच्या आई-वडिलांनी नालासोपारा येथे राहणार्या आपल्या भावाच्या घरी देखील जाऊन चौकशी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदरची मुलगी एका रिक्षामध्ये बसून कुठेतरी गेल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी सदर रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
रिक्षावाल्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु नंतर पीडित मुलगी व एका स्त्रीला आपण माणगाव येथे सोडल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी माणगाव येथे जाऊन चौकशी केली असता वाळवटी येथील पीडित मुलीच्या शेजारी राहणारी स्त्री व माणगाव येथे राहणारी तिची बहीण या दोघींनी मुलीला नालासोपारा येथे नेऊन आपल्या छोट्या भावाजवळ जबरदस्ती लग्न लावल्याचे निष्पन्न झाले. परंतु सदरची मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी चार महिला व दोन पुरुष आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे.