न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाची कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
मागील आठवड्यात रक्तचंदनाचा साठा जप्त केल्यानंतर न्हावा-शेवा सीमा विभागाच्या एसआयआयबी अधिकार्यांनी दुबईतून हैदराबाद येथे बेकायदेशीररित्या तस्करी मार्गाने पाठविण्यात आलेल्या 11.40 कोटी किमतीचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला.
बंदी असतानाही तस्करी मार्गाने दुबईतून 40 फुटी कंटेनरमधून जिप्सी प्लास्टर बोर्डच्या बनावट नावाखाली 400 कार्टूनमधून 57 लाख विदेशी सिगारेटचा साठा पाठविण्यात आला होता. हा विदेशी सिगारेटचा साठा हैदराबाद येथील एका कंटेनर यार्डात पाठविण्यात येणार होता. मात्र, न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या एसआयआयबी अधिकार्यांना या तस्करी मार्गाने पाठविण्यात येणार्या विदेशी सिगारेटच्या मालाची बित्तंबातमी मिळाली होती. त्यानंतर एसआयआयबी अधिकार्यांनी संशयित कंटेनरची कसून तपासणी केली असता मोठ्या खुबीने लपवून ठेवण्यात आलेला विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या विदेशी सिगारेटच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांकडून अधिक तपास केला जात आहे.