आरक्षणाचे फॉर्म चक्क गुजराती भाषेत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत स्थानकात असलेल्या संगणकीय आरक्षण केंद्र येथे गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना भरण्यासाठी दिलेले फॉर्म हे चक्क गुजराती भाषेत दिले आहेत. त्याबाबत स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी कर्जत स्थानक प्रबंधक यांच्याकडे जाऊन जाब विचारला असता स्थानक प्रबंधक प्रभाष कुमार लाल यांची भाषा फार उर्मट होती. दरम्यान, कर्जत स्थानकाचे कमर्शियल प्रबंधक शिरीष कांबळे यांनी स्थानिकांच्या भावनांचा आदर राखत संगणकीय आरक्षण केंद्र येथे मराठी भाषेतील फॉर्म उपलब्ध करून दिल्याने संभाव्य राडा टळला आहे.
कर्जत रेल्वे स्थानकात मराठीऐवजी गुजराती भाषेतील आरक्षण फॉर्म मिळत असल्याची माहिती मनसेच्या महिला शहर अध्यक्ष भारती कांबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्जत स्थानकातील संगणकीय आरक्षण केंद्र येथे फॉर्म मागवून घेतला असता त्यांना धक्काच बसला. त्यावेळी भारती कांबळे यांनी मराठी भाषेत आरक्षण फॉर्म का नाही, अशी विचारणा केली असता कर्जत रेल्वे स्टेशन प्रबंधक प्रभाष कुमार लाल यांनी उद्धट भाषेत उत्तर दिले. मागील काही दिवसांपासून कर्जत रेल्वे स्थानकात गुजराती भाषेत रेल्वे आरक्षण फॉर्म दिले जात असल्याने मराठी भाषिक नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर यांनी महिला प्रवाशांसोबत वापरलेली भाषा निंदनीय व निषेधार्ह आहे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. याबाबत रेल्वे विभागाचे कमर्शियल निरीक्षक शिरीष कांबळे यांना संपर्क करुन ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी मराठी भाषेतील आरक्षण फॉर्मची कमतरता असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून गुजराती भाषेतील आरक्षण फॉर्म उपलब्ध केले असल्याचा खुलासा केला. मात्र, तात्काळ मराठी भाषेतील आरक्षण फॉर्म उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिले. मराठी राजभाषेचा अवमान कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक लाल यांच्याकडून सुरू आहे.त्यामुळे मनसेचा हिसका दाखवावा लागेल, असा इशारा मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि मनसे रेल्वे युनियनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला आहे.
स्थानक प्रबंधकाची मुक्ताफळे
याबाबत प्रवाशांनी कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन मराठी भाषेचा अपमान करुन महिला प्रवाशांना उद्धट भाषा वापरली. त्यावेळी स्थानक प्रबंधक लाल यांनी भारती कांबळे यांना इतर ठिकाणी तुम्ही मराठी मराठी करत नाहीत. रेल्वेच्याच कारभारात तुम्ही मराठी मराठी का करता, अशी मुक्ताफळे उधळण्यास सुरुवात केली.
मराठी राजभाषेचा अवमान आम्ही सहन करणार नाही. स्थानक प्रबंधक यांची भाषा सुधारली पाहिजे अन्यथा आंदोलन करावे लागेल.
– प्रभाकर गंगावणे, सचिव,
कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन