गरोदर मातेसाठी मिळणार रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री नंबर
| पनवेल | प्रतिनिधी |
एका गरोदर महिलेच्या प्रसूती वेदनेवेळी रुग्णालयात नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने संबंधित महिलेला हातगाडीवर रुग्णालयात नेण्यात आल्याची घटना पनवेल पालिका हद्दीत काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व जनसामान्यास महापालिका देत असलेल्या सोयी-सुविधांची माहिती मिळण्यासाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार महानगरपालिका क्षेत्रातील गरोदर मातेस उपलब्ध मोफत रुग्णवाहिका सेवेचे टोल फ्री नंबर लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहेत.
आजपर्यंत महापालिकेच्यावतीने गरोदर मातेसाठी निःशुल्क उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेने 289 प्रसूती रुग्णांसाठी अगदी मुंबईपर्यंत संदर्भ सेवा दिली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेतील प्रसूती रूग्ण परदेसी गौंड यांना न मिळालेल्या संदर्भ सेवेबाबत चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार प्रसूतीपूर्व आशा सेविका व आरोग्य सेविकांमार्फत वारंवार भेट देऊन माता बाल संगोपन कार्डवरती रुग्णवाहिकेचे 108 व 102 नंबर तसेच आशा सेविकेचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. गरोदर मातेच्या सर्व चाचण्या, सोनोग्राफी महापालिकेमार्फत निःशुल्क करून देण्यात आल्या होत्या. परंतु, सदर गरोदर मातेस दिलेल्या तारखेआधीच प्रसूती वेदना सुरू झाल्या व त्यांना खासगी डॉक्टरांनी 108 क्रमांवर संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालय येथे जाण्याचे सुचवले.त्यानुसार नातेवाईकांनी 108 टोल फ्री क्रमांकावरील रुग्णवाहिकेस कळविले. मात्र, पुन्हा 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा व रुग्ण नातेवाईक यांच्यामध्ये फोनद्वारे योग्य तो संपर्क झाला नाही. तसेच नातेवाईकाने 102, उपजिल्हा रुग्णालय, महानगरपालिकेच्या रुग्णावाहिकेसाठी कोणताही संपर्क साधला नाही. तोपर्यंत उशीर होत असल्याने नातेवाईकांनी उपलब्ध वाहनातून रुग्णास उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे प्रसूतीसाठी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची नैसर्गिक प्रसूती होऊन बाळास जन्म दिला. दि. 12 सप्टेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी मातेस घरी सोडण्यात आले.
रुग्णवाहिकेच्या 108 क्रमांक आस्थापनेस याबाबतचा संपूर्ण खुलासा सादर करण्याबाबत चौकशी समितीने सूचित केले आहे. भविष्यात अशा संदर्भ सेवेपासून रुग्णांनी वंचित राहू नये यासाठी पालिकेच्या रूग्णवाहिकेसाठी टोल फ्री नंबर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. टोल फ्री नंबर आल्यानंतर यास व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
रुग्णसेवेसाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच कटिबद्ध असून, इतर रुग्णांसाठीच्या संदर्भ सेवेसाठीदेखील लवकरात लवकर ठराव घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागास सूचित केले आहे.
निःशुल्क रुग्णवाहिका सेवा
1. डॉ. रेहाना मुजावर, माता बाल संगोपन अधिकारी 93728871230
2. वाहन चालकचे नाव : नरेंद्र सोनवणे 7021572916, वेळ सकाळी 7 ते रात्री 7
3. वाहन चालकचे नाव : धर्मा गवळी 9594746527, वेळ रात्री 7 ते सकाळी 7