थळ डोंगरीतील अनधिकृत बांधकाम जेसीबीने जमीनदोस्त; दोघांविरोधात वन गुन्हा दाखल
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वनजमिनीवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अलिबाग वन विभागाने थेट जेसीबी कारवाईतून दणका दिला आहे. थळ डोंगरी येथील संरक्षित वनक्षेत्रात उभारण्यात आलेले अनधिकृत बांधकाम वन विभागाने जमीनदोस्त केले. वारंवार सूचना आणि लेखी नोटीस देऊनही बांधकाम सुरू ठेवल्याने वन विभागाने कठोर कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थळ परिसरातील संरक्षित वनक्षेत्रात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार कार्ला परिमंडळातील वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता लाल विटा, सिमेंट आणि सिमेंटच्या पत्र्यांचा वापर करून पक्के बांधकाम सुरू असल्याचे आढळले. यापूर्वीही याच ठिकाणी अतिक्रमणाचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी वन विभागाने बांधकाम हटवले होते. संबंधितांना वारंवार तोंडी सूचना देतानाच 12 ऑक्टोबर रोजी लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, नोटीस आणि सूचनांना धुडकावून बांधकाम सुरूच ठेवल्याने वन विभागाने कारवाईचा बडगा उगारला.
उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. कार्ला येथील वनपाल आणि वन कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. शुक्रवारी (दि. 27) थळ डोंगरी येथील सर्व्हे क्रमांक 149/1 मधील संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेले अनधिकृत पक्के बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करून बांधकामाची छायाचित्रे घेण्यात आली. या कारवाईमुळे संबंधित वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
वनक्षेत्रात विनापरवाना बांधकाम, कुंपण घालणे, जमीन साफ करणे किंवा वनेतर वापर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. वनजमिनीवर अतिक्रमण करू नये, तसेच अशा कामांसाठी ठेका घेऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे. वनक्षेत्रात अतिक्रमण अथवा अवैध कृत्य आढळल्यास जवळच्या वन कार्यालयात किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.






