| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी (दि.24) सकाळी सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला ढाका पासून दूर असलेल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तमिम ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमधील सामना खेळत होता. मोहम्मडन स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यात हा सामना खेळला जात आहे.
सामन्यादरम्यान इक्बालच्या छातीत अचानक दुखू लागले. सुरूवातीला त्याला एअरलिफ्ट करून ढाका येथे आणण्याची तयारी सुरू होती, मात्र तसं होऊ शकलं नाही. यानंतर त्याला फाजिलातुनेसा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पोर्टस्टारने बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ. देबाशीष चौधरी यांनी सांगितले की, “सुरूवातीला त्यांची स्थानिक रुग्णालयात तपासणी करण्यात आली, जिथे ह्रदयविकाराचा सौम्य त्रास झाल्याचा संशय होता. यानंतर त्याला ढाका येथे नेण्याचे प्रयत्न करण्यात आले. पुढे ते म्हणाले, मात्र हेलिपॅडच्या दिशेने जात असताना त्याला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्याला परत न्यावे लागले. क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर चौधरी यांनी सांगितलं की, आपल्या सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. तो सध्या निरीक्षणाखाली आहे आणि वैद्यकीय पथक तो बरा व्हावा यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.” तमिम इक्बालन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, नंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या मध्यस्थीनंतर तमीमने निवृत्ती मागे घेतली. तमिमला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशकडून खेळण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने ही विनंती मान्य करण्यास नकार देत त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली. तमिमने बांगलादेशसाठी 70 कसोटी, 243 एकदिवसीय आणि 78 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 5134 धावा, एकदिवसीय सामन्यात 8357 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1778 धावा केल्या.