काव्या-रुद्र चॅलेंजर्सला उपविजेतेपद; साई लोके ठरला मालिकावीर
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथे चौलमळा क्रिकेट लीग टेनिस क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. 23) मोठ्या उत्साहात पार पडली. रिया टायगरने सलग दुसर्या वर्षी विजेतेपद पटकावत काव्या-रुद्र चॅलेंजर्सचा पराभव केला. रिया टायगरकडून संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणार्या साई लोके हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने अंतिम सामन्यात अवघ्या 14 चेंडूंत तब्बल 42 धावांची तडाखेबाज खेळी केल्याने रिया टायगरला चार षटकात 62 धावांचे आव्हान ठेवता आले. परंतु, 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना काव्या-रुद्र चॅलेंजर्सचा अवघ्या 42 धावाच करु शकला. त्यामुळे रिया टायगरने अंतिम सामना 20 धावांनी जिंकत विजेतेपदावर नाव कोरले.

चौलमळा क्रिकेट संघातील खेळाडूंच्या संकल्पनेतून ही स्पर्धा चौल-पाझर येथील मैदानावर खेळविण्यात आली. गावातील तरुण पिढीमध्ये एकोपा व एकमेकांबद्दल जिव्हाळा राहावा, या उद्देशाने आयोजित स्पर्धेला तरुणांसह आबालवृद्धांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिला मंडळानेसुद्धा एक दिवस गावासाठी काढत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही स्पर्धा आनंदी वातावरणात पार पडली.
तत्पूर्वी, अंतिम सामना सचिन दत्तात्रेय आमरे संघमालक असलेल्या रिया टायगर आणि शैलेश अनंत नाईक संघमालक असलेल्या काव्या-रुद्र चॅलेंजर्स या दोन संघामध्ये झाला. रिया टायगरने साई लोकेची अष्टपैलू खेळी आणि त्याला लाभलेली अनुभवी गोलंदाज दीपक लाड, विशाल घरत आणि सोमेश यांची साथ यामुळे हा सामना सहज जिंकला. प्रत्युत्तरात काव्या-रुद्रला अवघ्या 42 धावाच करता आल्या. सलमीवीर साईप्रसाद पडवळ आणि सिद्धेश जाधव हे शून्यावर बाद झाल्याने त्यांचा संघ मोठी मजल मारु शकला नाही. त्यामुळे त्यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. विजेत्या स्पर्धकांना गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, उपाध्यक्ष तथा भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, उपाध्यक्ष अंजेश घरत, महिला मंडळ अध्यक्षा प्रमिता पाटील, गावचे खजिनदार अल्पेश घरत, माजी सरपंच वामन घरत, प्रभाकर नाईक, अनंत म्हात्रे, अनंत घरत, विलास शिवलकर, अनिल नाईक, नंदकुमार म्हात्रे, दत्तात्रेय जाधव, जनार्दन नाईक, रवींद्र नाईक, जीवन लोहार, पांडुरंग पाटील, अनिल चोगले, सातबारा हॉटेलचे मालक समीर घरत आदींसह गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक चौलमळा क्रिकेट संघाचे अनिकेत म्हात्रे, जयेंद्र म्हात्रे, ओमकार पाटील, प्रणव पाटील, विशाल घरत, चिन्मय घरत, अभिषेक घरत, सर्वेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य सहकार्यांनी मेहनत घेतली. दरम्यान, शशिकांत म्हात्रे आणि सुशांत शिवलकर यांनी उत्कृष्ट समालोचन करुन स्पर्धेला रंगत आणली.
पारितोषिकांचे मानकरी
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- सुजित म्हात्रे (6 कॅच)
उत्कृष्ट फलंदाज- साईप्रसाद पडवळ (67 रन)
उत्कृष्ट गोलंदाज- मिलिंद मनोरे (8 विकेट्स)
मालिकावीर - साई लोके (166 रन आणि 5 विकेट्स)
तिसर्या क्रमांकासाठी चिठ्ठी
अंतिम सामन्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता यावा. अंधार होण्याआधी स्पर्धा सुरळीत पार पडावी. यासाठी मंदार नाईक संघमालक (अद्वैत फायटर्स) आणि सुनील घरत संघमालक (श्री माऊली केबल नेटवर्क) या दोन्ही संघमालकांनी मनाचा मोठेपणा दाखवत सामना न खेळता चिठ्ठीच्या माध्यमातून जो क्रमांक येईल तो मान्य करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, चिमुकली वेला लोहार हिच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यानुसार श्री माऊली केबल नेटवर्क संघाला तृतीय क्रमांकाचा मानकरी घोषित करण्यात आले.