चारशे लिटर गावठी दारू जप्त

वावे नाका ते वळवळी गावादरम्यान रेवदंडा पोलिसांची कारवाई

| रेवदंडा | प्रतिनिधी |

अवैध गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात रेवदंडा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 400 लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या कारवाईत दारूच्या साठ्यासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण 3 लाख 42 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि.17) दुपारच्या सुमारास अलिबाग-रोहा मार्गावर वावे नाका ते वळवळी गावादरम्यान करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी पुरवठा करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनावर कारवाई केली आहे. यावेळी दारूने भरलेल्या रबरी ट्यूब आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे 3 लाख रुपये किमतीची कार आणि गावठी हातभट्टीची दारू यांचा समावेश असून, एकूण मुद्देमालाची किंमत 3 लाख 42 हजार 200 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंड्याचे पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Exit mobile version