दोन अपघातात चार ठार

| पुणे | प्रतिनिधी |

नाशिक आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या दोन भीषण अपघातात चार जणांना मृत्यू झाला आहे. पुण्यात नगर कल्याण महामार्गावरील पिंपळगाव जोगा येथे लक्झरी आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. तर, नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळही बस आणि कारचा भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी रस्त्यावरील आकराळे फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर दोन्हीही गाड्यांनी अचानक पेट घेतल्यामुळे सगळ्यांची दमछाक झाली होती. बसने पेट घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या कारला पाचारण करण्यात आले, पण तोपर्यंत आगीत बस आणि कर जळून खाक झाली. या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गावरही लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक बसली. आळे फाट्यावरुन कल्याणच्या दिशेने जाणार्‍या बसची समोरुन येणार्‍या कारला समोरासमोर धडक झाली. त्यामध्ये, कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, रिया गायकर व कुसुम शिंगोटे अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केलं. मात्र, या अपघात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा नामा केला आहे.

Exit mobile version