वेगवेगळ्या दोन अपघातात चार जण जखमी; वाहनांचे नुकसान

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलजवळील खालापूर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर खालापूर पोलीस ठाणे पळस्पेपासून 13/800 अंतरावर दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात चालक व क्लीनर असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. राकेश कांबळे (27, रा. बाहे-सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्र. के.-29-4839 घेऊन जात असताना त्याचा आपल्या ट्रकवरील ताबा सुटून त्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला शोल्डर लेनवर उभा असलेला ट्रॅक क्र. एच.आर.-55-एस-7141 ला पाठीमागून डाव्या बाजूने जोरात ठोकर मारली. या अपघातात ट्रक चालक राकेश कांबळे व क्लीनर निखिल गायकवाड या दोघेही जखमी झाले असून, त्यांना तात्काळ महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेचे पोलीस उपनिरीक्षक वसंत केसरकर यांनी पळस्पे मोबाईल स्टाफच्या मदतीने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचाराकरिता दाखल केले.

तर, दुसर्‍या घटनेत पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे येथे मुंबई लेनवर कि.मी.23/100 येथे ट्रकचालक अमलेश चोबे (30, रा. झारखंड) आपल्या ताब्यातील ट्रक क्र. ओ.डी-11-पी-7317 ने मुंबईकडे जात असताना त्यांच्या ट्रकला क्रिएटा कार क्रं. एम.एच-47-ए.बी-7306 वरील चालक दर्शशित हरकुट्टन (23, रा. जोधपूर) याचा त्याच्या कारवरील ताबा सुटल्यामुळे त्याने ट्रकला पाठीमागील बाजूस धडक दिली. या अपघातात कार मधील जखमी रिद्धी तहार (25, रा. सूरत) व मोनिका तहार (22, रा. इचलकरंजी) यांना दुखापत झाली असून, या अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Exit mobile version