। अलिबाग । प्रतिनिधी ।
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याविरोधात राज्यातील शिक्षक एकवटले असून 25 सप्टेंबरला एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत. रायगड जिल्ह्यातदेखील या आंदोलनाची तयारी सुरु असून जिल्ह्यातील चार हजारपेक्षा अधिक शिक्षक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. तरीदेखील मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोणतेही सरकारने पाऊल उचलले नाही. यामुळे सर्व शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम आहेत. शिक्षक सामुहिक रजेवर जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. शिक्षक संघटनांनी येत्या 25 सप्टेंंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीला शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन उपस्थित होते.
या बैठकीत अनेक निर्णय या सर्वानुमते घेण्यात आले होते. शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत हे निर्णय झाल्याने शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण होते. परंतु, अद्यापही शासनाने यावर कुठलीच अंमलबजावणी केली नाही. यामुळे सामुहिक रजा आंदोलन आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद रायगड जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड यांनी दिली आहे.