राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आरोप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यामध्ये केवळ खासदार तटकरे यांचा लाडका श्रीवर्धन हा एकच तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. बाकीच्या 14 तालुक्यांना वंचित ठेवण्याचे काम खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटातील जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. उरलेले चौदा तालुकेही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावेत, तसेच जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना सवलती आणि मदत तातडीने मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सोमवारी (दि.5) निवेदनाद्वारे करण्यात आली.
रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात झाली. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला नाही. पावसाने दडी मारली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सुरु झाला. या पावसामुळे दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले. भातपीक बहरले आहे. मात्र, पाऊस नसल्याने भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत. अशा परिस्थितीत केवळ एकाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करणे आणि बाकीच्या तालुक्यांना वंचित ठेवणे, हे उचित नाही. याबाबत पक्षाची आढावा बैठक रोहामध्ये घेण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने सोमवारी (दि.5) जिल्हाधिकारी जावळे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये व शेतमजुरांना 25 हजार रुपये अशी भरपाई मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसह दुधाला वाढीव बाजारभाव मिळावा, अशा अनेक मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा चव्हाण यांनी दिला.
जिल्ह्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याची उपलब्धता, रोजगाराचा प्रश्न आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट याचा प्रशासनाने तातडीने आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दूध खरेदीच्या दरामध्ये योग्य प्रमाणात वाढ करण्यात यावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक आर्थिक व इतर सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.






