गुंतवणुकीत जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

फसवणूक केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

| रसायनी | प्रतिनिधी |

चौक, खालापूर परिसरात पैशांच्या गुंतवणुकीवर दुप्पट, तिप्पट व्याज देण्याचे तसेच बक्षिसांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी फसवणूकदारांनी सावी कन्सलटन व अन्य दोन कंपनीच्या नावे सुसज्ज असे कार्यालय सुरू केले होते. चांगले व्याज, थोड्याच अवधीत दुप्पट रक्कम याची अनेक गुंतवणूकदार यांना भूल पडली. यावेळी कार्यालयाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना भेटवस्तू, चांगली वागणूक देऊन त्यांना आकर्षित केले जायचे. त्यामुळे परिसरातील मोठे व्यावसायिक, नोकरदार वर्ग ते सर्वसामान्य गुंतवणूकदार हे ओढले गेले. विशेष म्हणजे हे काम येथील स्थानिकांकडूनच करवून घेत होते. त्यामुळे त्यांच्याच भरवशावर स्थानिक लोकांनी आपली गुंतवणूक केली. परंतु, कालांतराने भेटवस्तू देणे व चांगली वागणूक कमी झाली.

त्याचबरोबर व्याज न देणे, दिलेला शब्द पूर्ण न करणे या गोष्टी सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संशय वाढू लागला. दरम्यान, कार्यालय सतत बंद दिसत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संशय अधिकच बळावला. यात अनेकजण फसले गेल्याची माहिती परिसरातील लोकांना कळू लागल्यावर सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्याविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी श्वेता प्रभू, पंकज शहा व देवेंद्र सरदार या तिघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे करीत आहेत.

Exit mobile version