। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वाकस येथे 100 एकर जमिनीवर उभ्या राहत असलेल्या विजय इस्टेट या गृहसंकुलात सदनिका बुक करणारे शेकडो ग्राहक यांची फसवणूक झाली आहे. त्यातील काही ग्राहकांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपली तक्रार दिल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यात विजय इस्टेट ग्रुपचे मालक अतीव गाला यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 2013 पासून मुंबई मानखुर्द येथील 44 वर्षीय डॉ. गजानन विनायक कागलकर यांनी विजय ग्रुप हौसिंग प्रायव्हेट लिमिटेडची जाहिरात पाहिली. डॉ. कागलकर यांनी 2017 मध्ये विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडच्या गृह प्रकल्पात घर घेण्यासाठी वाकस येथील साईटवर येऊन सुरू असलेले काम पाहिले. या 100 एकर मधील गृह प्रकल्पात फेज एकमध्ये वन बीएचके चा फ्लॅट घेण्याचे कागलकर कुटुंबीयांनी निश्चित केले. त्यानंतर डॉ. कागलकर हे मुलगी रुपाली गजानन कागलकर आणि धनंजय चाचड यांच्यासह विजय ग्रुप हौसिंग कंपनीच्या ठाणे येथील कार्यालयात फेज एक मधील 319 कार्पेट क्षेत्र असलेला फ्लॅट 16 लाख 92 हजाराचा नक्की केला आणि 9999 रूपये अनामत रक्कम आपले जवळील बँकेचे डेबिट कार्डमधून सदर रक्कम स्वॅप करून दिली. 2018 मध्ये कर्जत तालुक्यातील वाकस येथील विजय इस्टेट मधील गृह प्रकल्पाचे काम बंद झाले. त्याबाबत माहिती होताच डॉ.कागलकर हे वाकस येथे आले आणि बंद पडलेल्या कामाची पाहणी केली. वाकस येथील विजय इस्टेटमध्ये एक हजाराहून अधिक लोकांनी बुक केलेल्या सदनिका बाबत मुंबई चर्चगेट येथील रेरा कार्यालयात तक्रारी देण्यास सुरुवात झाली. 2020 पर्यंत असंख्य सदनिका धारक यांनी रेरा कोर्टाकडे तक्रारी नोंदविल्या असून रेरा न्यायालयाने विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे संचालक अतीव गाला यांना संबंधित सर्व सदनिका धारक यांना त्यांनी बुक केलेली घरे देण्यात यावीत किंवा त्यांनी विजय हौसिंग कंपनीला दिलेली रक्कम व्याजासह परत करावी असे लेखी आदेश दिले होते. मात्र मागील वर्षभरात विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कडून कोणत्याही सदनिका धारक यांना व्याजासह रक्कम किंवा सदनिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई मानखुर्द येथील डॉ. गजानन कागलकर यांनी एप्रिल 2021 रोजी नेरळ पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाली आहे अशी लेखी तक्रार दिली होती.नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सर्व कागदपत्रे यांची खात्री करून 18 सप्टेंबर 2021 रोजी विजय ग्रुप हौसिंग लिमिटेडचे मालक अतीव गाला यांच्याविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406 तसेच महाराष्ट्र महसूल मालकी हक्क अधिनियम 1963 चे 4 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर हे अधिक तपास करीत आहेत.