गॅस कंपनीच्या नावाने लाखोंची फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

गॅस कंपनीच्या नावाने मोबाइलवर एपीके फाइल पाठवून दोन ग्राहकांची 12 लाखांहून अधिक रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल शहरातील लोकमान्यनगर येथील एका सोसायटीत राहणाऱ्या तरुणाच्या मोबाइलवर एका गॅस कंपनीच्या नावाने एपीके फाइल पाठविण्यात आली. संबंधित तरुणाने ती डाउनलोड करताच त्याच्या बँक खात्यातून 5 लाख 97 हजार रुपये विविध खात्यांमध्ये वळते करण्यात आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत खांदेश्वर सेक्टर 11 मध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त व्यक्तीला एका व्यक्तीने फोन करत गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्यानंतर सेवा शुल्कासाठी 12 रुपये भरण्याचे कारण देऊन मोबाइलवर एपीके फाइल पाठविली. ती डाउनलोड केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून 7 लाख 25 हजार रुपये परस्पर वळते करण्यात आले.

Exit mobile version