| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील देवद गावातील प्रकल्पात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची 18.75 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरुद्ध खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वडघर येथील सुमित चंद्रकांत कांबळे यांना अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विनीत राजेंद्र सोरटे यांनी देवद येथील प्रकल्पात पहिल्या मजल्यावरील 500 चौ. फुटांचा वन बीएचके फ्लॅट, तसेच दहाव्या मजल्यावरील 350 चौ. फुटांची एक सदनिका देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी ऑनलाइन, धनादेश आणि रोख स्वरूपात एकूण 18 लाख 75 हजार रुपये स्वीकारले. मात्र, पैसे घेतल्यानंतर ना फ्लॅटचा ताबा दिला, ना रक्कम परत केली. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. चौकशीनंतर खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि अपहाराच्या कलमांनुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.
घराच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक
