200 रुग्णांनी घेतला लाभ
| चणेरा | प्रतिनीधी |
मुरुड तालुक्यातील महाळुंगे (बुद्रुक) गावचे समाजसेवक कै. शशिकांत पारवे यांच्या स्मरणार्थ पारवे परिवाराने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरास पंचक्रोशीतील रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. 200 हून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला.
या शिबिरास कूपर रुग्णालय (मुंबई) येथील डॉ. शशिकांत म्हशाळ, डॉ. धनश्री बी., डॉ. वरुण मालपाणी, डॉ. राहुल शेनॉय, डॉ. रोशनी मोहंती (हे सर्व कान, नाक, घसा तज्ज्ञ) तसेच जळगाव येथून डॉ. धनंजय बेंद्रे (बालरोग तज्ज्ञ), डॉ. सुनिती बेंद्रे (स्त्रीरोग तज्ज्ञ) आणि मुंबई येथून डॉ. आदित्य बेंद्रे (अस्थीरोग तज्ज्ञ), डॉ. मनाली बेंद्रे (रेडिओलॉजिस्ट), बोर्ली येथून स्थानिक डॉ. अन्सार चोगले व डॉ. मानसी दिवेकर आदींनी रुग्णांना मोफत सेवा पुरवली. आपटे-पनवेल येथील अमित वग्रे यांनी विविध रोगांवरील औषधे उपलब्ध करुन दिली. यादव गवळी समाजातील वाघोली गावचे डॉ. रवींद्र वालेकर यांनी त्यांच्याकडील उपयुक्त साधनसामुग्री उपलब्ध करुन दिली. तसेच शिबिराबाबत मार्गदर्शन केले.
सकाळी 10 ते 2 ह्या वेळेत पार पडलेल्या शिबिराचे उद्घाटन सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले . उपस्थित डॉक्टरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवरांचाही गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. शशिकांत म्हशाळ यांनी श्रद्धांजलीपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक दांडेकर गुरुजी यांनी केले.







