तहसीलदारांच्या हस्तक्षेपाने ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित
| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वयाळ ते लोधीवली या रस्त्याच्या दुरवस्थेवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात चालू असलेला वाद अखेर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मध्यस्थीने तात्पुरता निवळण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मार्ग शोधण्याच्या उद्देशाने तहसीलदारांनी त्यांच्या दालनात दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोव्हेंबर महिन्यात तात्काळ पाहणी व काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून लोधीवली ते वयाळ रस्ता अत्यंत खराब स्थितीत असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन कामामुळे रस्ता उद्ध्वस्त झाला असून, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आहे. दोन विभागांच्या वादात ग्रामस्थ मात्र पिचले गेले आहेत.
पालकांना शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडावे लागत होते, तर पावसाळ्यात रस्त्याची अवस्था बिकट बनते. याच कारणामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची विनंती करण्यात आली होती. तहसीलदार अभय चव्हाण यांनी तातडीने बैठक बोलावून दोन्ही विभागांना जबाबदार धरत स्पष्ट निर्देश दिले की, नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू करावे. त्यांच्या मध्यस्थीमुळे वयाळ ग्रामस्थांचे प्रस्तावित तीव्र आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती खालापूर, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी माणिक सानप, ग्राम महसूल अधिकारी मधुसूदन पापटवार, ग्रामपंचायत अधिकारी गोकुळदास राठोड यांच्यासह सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रोशन गायकवाड, विनोद भोईर, प्रमोद पवार, अर्जुन पवार,अनिल पवार, समीर म्हात्रे, देवा पवार, अक्षय म्हात्रे,जनार्दन पवार, दिगंबर मापाडी,अमर ठाकूर,रुपेश पवार, नितीन ठाकूर, भूषण म्हात्रे भरत म्हात्रे, मारुती पवार, अनंता पवार,अशोक पवार,दिनेश पवार, अतिष ठाकूर, अतिष म्हात्रे, अनंता म्हत्रे,सुरेश देशमुख,सुनील पवार, संदीप पवार, सुरेश पाटील, रोहित ठाकूर, शेखर ठाकूर, अविनाश पाटील,मधुकर पवार, महेंद्र पवार, संदीप म्हात्रे,सागर म्हात्रे,पंकज पवार, दर्शन म्हात्रे, शुभम म्हात्रे, रामदास पाटील,समीर पवार,गणेश पवार,जय पवार,महेश म्हात्रे,कुलदीप ठाकूर, दत्ता पवार, अमोल पवार,कल्पश पवार, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





