महिलांसह ग्रामस्थ आक्रमक; कुजलेल्या अन्नामुळे दुर्गंधी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत माजगाव हद्दीतील असलेला खोकर पूल हा सावरोली खारपाडा मार्गावर असून, सध्या या पुलाची अवस्था बिकट आहे. त्यातच या ठिकाणी कामगार वर्ग उरलेले अन्न या नैसर्गिक ओढ्यात टाकत असल्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत असून, पाणी दूषित झाले आहे. याठिकाणी महिला कपडे धुण्यासाठी त्याचबरोबर मोकाट गुरे तसेच शेतकरी गुरांना पाणी पिण्यासाठी येथे आणतात. मात्र, या ठिकाणी टाकलेल्या अन्नाच्या दुर्गंधीमुळे गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत हे पाणी असल्यामुळे गुराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत होता. या ठिकाणी नवीन कारखाना उदयास आल्याने येथील कामगार रात्रीचे राहिलेले अन्न सकाळी या ओढ्यात टाकत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी पावसाळ्यात खूप पाणी येत असल्यामुळे तेथेच तीन स्मशानभूमी असून, गणपती विसर्जन या ठिकाणी होत असते. यामुळे येथील नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. उन्हाळा सुरु झाला की हा ओढा कोरडा पडत असतो. मात्र, जोपर्यंत पाणी या ठिकाणी असते, तोपर्यंत येथील ग्रामस्थ या पाण्याचा वापर करतात. परंतु, येथील पाणी आता दूषित होत चालले आहे. या ठिकाणी हे अन्न अनेक दिवस राहिल्यामुळे कुजून दुर्गंधी पसरुन विविध आजार निर्माण होण्याचा धोका संभव आहे. परिणामी, ओढ्यात टाकलेल्या अन्नामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत चालले आहे.
सावरोली-खारपाडा इसांबानजीक असलेल्या खोकर पुलाच्या खाली शिल्लक राहिलेले अन्न टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, आमच्या कामगारांनी ते टाकलेले नाही. मात्र, तरीसुद्धा या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. तसा फलक लावण्यात येणार असून, येथे अन्न टाकू नये, अशी सक्त सूचना करण्यात येणार आहे.
अर्जुन भोसले,
व्यवस्थापक, टोयो कोलेन इसांबा







