पेण फोटोग्राफर असोसिएशनने जपली सामाजिक बांधिलकी
| खरोशी | प्रतिनिधी |
‘एक दीपावली, आदिवासी मुलाबाळांसाठी’ या संकल्पनेतून रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनसोबत संलग्न असलेल्या पेण फोटोग्राफर असोसिएशनकडून पेण येथील भोंगळवाडी आदिवासी वस्तीवर 55 कुटुंबांना दीपावलीचे फराळ, मुलांना छोटे फटाके व येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला. हे सामाजिक कार्य करत असताना त्या माता-भगिनींच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून यावर्षी दिवाळीचा आनंद मिळाला तो आजपर्यंत कधीच मिळाला नव्हता, असे मनोगत रायगड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष समीर भायदे यांनी व्यक्त केले.
गेली अनेक वर्षे पेण फोटोग्राफर असोसिएशन हा उपक्रम राबवत आहे. यासोबत समाजोपयोगी कामे करत आहे. यापूर्वीही तालुक्यातील विविध आदिवासी भागात जवळपास 800 हुन अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अशाच गरीब व गरजूंना मदत करून दिवाळी साजरी करण्याचा असोसिएशनने संकल्प पूर्ण करून आज पूर्णत्वास आला असल्याने प्रत्येक पदाधिकारी आणि सदस्यांना समाधान वाटले. यावेळी रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन अध्यक्ष समीर भायदे, जिल्हा सेक्रेटरी आनंद निंबरे पेण फोटोग्राफर अध्यक्ष समाधान पाटील, नावेद खान, सागर, निलेश म्हात्रे,देवा राऊत प्रकाश माळी तसेच फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपावली उत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असला तरी प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा दिवा पेटतोच असे नाही, प्रत्येकाला नवीन कपडे, गोडधोड, स्वादिष्ट खाऊ मिळतोच असेही नाही… या अनुषंगाने हा संकल्प हाती घेऊन पेण फोटोग्राफर असोसिएशनने पूर्ण केल्याने समाजातील विविध स्तरातून संस्थेच्या या कार्याचे कौतुक होत आहे.





