| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असतानाच अजित पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्हाचा अंतिम फैसला होईपर्यंत अजित पवार गटाला दिलेले ‘घड्याळ’ चिन्ह गोठवा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयाला स्वतंत्र अर्जाद्वारे केली आहे. याबाबत 25 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी अर्ज केला आहे. अजित पवार गटाला दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह गोठवून त्यांना नवे चिन्ह द्यावे, असे अर्जात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव व चिन्ह प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे होत आहे. हेच खंडपीठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अर्जाची सुनावणी घेणार आहे.