| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना 3 हजार, मदतनिसांना 2 हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत. वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. 25 सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर समितीमधील 7 घटक संघटनांचे 25 नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज 150 अंगणवाडी कर्मचारी 24 तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. 25 सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत.