संघर्ष समितीच्यावतीने आज श्राद्धाचा कार्यक्रम
एक तप उलटले तरीही ठेवी परत नाहीत
| पेण | संतोष पाटील |
कधीकाळी पेणसह रायगडवासियांच्या जीवनाची आधारस्तंभ असलेल्या पेण अर्बन बँक बुडीत घटनेला शुक्रवारी 23 सप्टेंबरला एक तप पूर्ण होणार आहे. 75 वर्षाच्या यशस्वी कारर्किदीनंतर पेण रायगड मुंबईतील अर्बन बँकेच्या आठरा शाखेंवर आर्थिक निर्बंध लादले. या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पूर्ण एक तप झाला तरी आजही बँकेचे खातेदार, ठेवीदार पैसे परत मिळतील या भाबडया आशेने आजही वाट पाहत आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पेण अर्बन बँक ठेविदार-खातेदार संघर्ष समिती बँक बुडवणार्यांचा श्राद्घ घालणार आहेत. श्राद्घ घालून सर्व सामान्यांचे पैसे परत मिळतील का? की फक्त एक राजकीय स्टंट होईल याचा ही विचार करणे गरजेचं आहे.

पेण अर्बन बँक आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तब्बल 12 वर्ष उलटून गेली खरी परंतू, म्हणतात ना कोर्टाचा काम आणि घडीभर थांब अशीच काहीशी अवस्था झाली आहे. 22 मार्च 2011 रोजी पेण अर्बन बँकेचे तत्कालीन प्रशासक सदस्य तुषार काकडे यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार बँकेत 2009-2010 कालावधीत रु. 403.18 कोटींचा आर्थिक तोटा असताना देखील 8.46 कोटींचा नफा असलेला ताळेबंद बँक संचालकाने स्वीकारला म्हण्ाून यांच्यासह कर्ज देण्याप्रकरणात गैरव्यवहार करुन खातेदारांचा विश्वासघात केल्या प्रकरणी संचालक शिशीर प्रभाकर धारकर (अध्यक्ष), अशोक लक्ष्मण झिंजे (उपाध्यक्ष), अनिल दिवाकर डेरे, जयंतीलाल मिलापचंद पुनमिया, जयवंत रघुनाथ गुरव, संतोष विनायक श्रृंगापुरे, बळीराम लहू पवार, शकील सय्यद कादरी, जयेश किशोर शहा, राजकुमार वतनदास सैनी, मिलींद दत्तात्रेय पाडगावकर, हरिश्चंद्र शंकर पाटील, राजन यशवंत काळे, नारायण हरिश्चंद्र सुर्वे, अविनाश महादेव आवास्कर, प्रेमकुमार शर्मा, विद्याधर चंद्रकांत प्रधान, प्रल्हाद दत्तात्रेय रिसबूड, पुरुषोत्तम वसंत जोशी, शेखर कृष्णा दांडेकर, चंद्रकांत शंकर ठाकूर, संजीव मोरेश्वर साळवी, रामचंद्र काशिनाथ म्हात्रे, संदिप तुकाराम सुर्वे, सुनिल सखाराम आवास्कर, विलास राजेंद्र बिडकर, दयानंद मोरेश्वर भगत, सुनिल गजानन टाकळे, विलास त्रिभुवन शहा, गिरीष प्रभाकर गुप्ते, दिनेश पदमाकर सावंत, संतोष पदमसिंह गुरखा, सुनिल दत्त शर्मा, एस.डी. जैथवार, धनु दर्शन दास, एस.पी सुळे, मेदा श्रीकांत देवधर, प्रिती मिलिंद वनगे, यांच्या व्यतिरिक्त तीन आरोपींचा मृत्यू झाला आहे. यांच्या विरुध्द पेण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र.आय.34/2011 भा.द.वि.सं.क.418, 420, 465, 467, 471, 477, 409, 163, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. आज 12 वर्ष झाली परंतु तारीख पे तारीख एवढेच चालू आहे.

ही बँक चालू व्हावी व ठेविदार खातेदारांना पैसे मिळावे म्हणून जर प्रामाणिक प्रयत्न कुणी केला असेल तर ते तत्कालीन आमदार धैर्यशील मोहनराव पाटील, आ.संजय केळकर आणि नरेंद्र जाधव व त्यांच्या सहकार्यांनी जे काही ठेविदारांना पैसे परत मिळालेले आहेत व आजही बँक जीवित आहे त्याचे सारे श्रेय धैर्यशील पाटील आणि नरेंद्र जाधव यांनाच जाते. परंतु, आजच्या घडीला ज्यांनी-ज्यांनी बँक बुडव्यांना मदत केली तेच आज कोल्हे कुई करताना दिसतात. बँक ज्यावेळी बुडाली त्यावेळी जर धारकर कंपनीला पेणच्या प्रस्थापित नेत्यांनी मदतीचा हात दिला नसता तर नक्कीच त्यावेळी बँकेची स्थावर जगंम मालमत्ता विकून ठेविदारांचे पैसे परत फेड करता आले असते. परंतु, राजकीय मंडळीनी राजकीय डाव साधला आणि धारकर पैसे भरतील अशा वल्गणा केल्या. बँक बुडाल्यानंतर झालेल्या सर्व साधारण सभेला विद्यमान आमदारांचे चिरंजीव वैकुंठ पाटील हे धारकरांच्या मांडीला मांडी लावून त्या सर्व साधारण सभेला उपस्थित होते. बँक बुडाली त्या वेळेला काँग्रेसची सत्ता असल्याने मंत्री रविशेठ पाटील यांनी धारकरांची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेटी गाठी घालून दिल्या. त्यामुळे धारकर शेफारले. हे कमी होते की काय तर 27 एप्रिल 2011 ला माणिकराव जगताप व तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत धारकरांच्या बगलबच्च्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला. आणि त्या जोरावर पेण नगरपालिका ताब्यात घेतली. 2011 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस धारकर गट विरूध्द अर्बन बँक संघर्ष समिती हा सामना रंगला. परंतु, यामध्ये धारकर गट आणि काँग्रेस निवडून आले. 2016 ला ही तेच घडलं धारकर गटाची छुपी मदत काँग्रेसला झाली.
आज 2022 च्या नगरपालिका निवडणुकीसाठी ज्या धारकराला मा. मंत्री रवी पाटील यांनी मदतीचा हात दिला तोच शिशिर धारकर आज रवि पाटलांच्या विरूध्द शंडू ठोकून मैदानात उतरला आहे. त्यामुळे आज मदत करणार्यांना अर्बन बँकेच्या ठेविदार खातेदारांची आठवण झाली आहे. ठेविदार खातेदारांना मदत करणे चांगलेच आहे. पंरतु, जर नगरपालिकेची निवडणूक डोळयासमोर ठेवून हे मदतीचे नाटक असेल तर पेणकर कधीच खपून घेणार नाहीत. गेल्या 12 वर्षात पेण अर्बन बँकेच्या 18 शाखांमधील जवळपास 503 ठेविदारांच्या आपल्या ठेवी परत मिळतील या ध्यासाने मृत्यू झाला आहे. हे ही सत्य आहे त्यामुळे अर्बन बँक हा मुद्दा राजकारण म्हणून वापरणार्यांना एवढीच विनंती आहे की, आपण ठेविदारांना फक्त मतदार म्हणून पाहत असणार तर हे चुकीचं आहे. 12 वर्ष झाली परंतु राजकीय मंडळीनी आश्वासनांची खैरात केली. आश्वासनाच्या जोरावर ठेविदारांनी मतपेटया भरल्या मतांच्या जोरावर राजकीय मंडळी खुर्चीवर बसले. परंतु, पैसे गेलेला ठेविदार आजही पैसे परत मिळतील या आशेवर जगत आहे. बँक बुडवणारे उजळ माथ्याने फिरत आहेत न्यायालयात तारीख पे तारीख पडत आहेत. परंतु पैसे काही मिळत नाहीत. अजून पहाट झाली नाही.
चार मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
बँक बुडाली त्यावेळी अशोक राव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. यांनी पेणसह अर्बन बँकेच्या ठेविदार खातेदारांना शब्द दिला होता की, कोणत्याही परिस्थितीत बँक सुरू केली जाईल. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील पेणमध्ये येऊन अर्बन बँक सुरू केली जाईल असं सांगितलं होतं. तर लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बँक सुरू होईल असा शब्द पेण नगरपालिकेच्या मैदानावर दिला होता. तर देवेंद्र फडणवीस यांनी 2016 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी तसेच 2019 च्या लोकसभेच्या वेळी अर्बन बँक सुरू केली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु, आजतागायत अर्बन बँक सुरू झाली नाही. आणि ठेवीदारांना पैसे मिळाले नाहीत. हे सत्य नाकारता येणार नाही.