मित्र आणि शत्रू

बुधवारी शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या दादर भागात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गेली काही दशके भाजप आणि शिवसेना यांचे राजकारण पाहत असलेल्या अनेकांना हे दृश्य अभूतपूर्व वाटले आणि हे दोन पक्ष सत्तासंघर्षात पुढच्या कोणत्या पातळीपर्यंत जातील असाही प्रश्‍न लोकांच्या मनात उपस्थित झाला. या संघर्षाला निमित्त झाले ते शिवसेनेचे मुखपत्र सामना दैनिकातील अग्रलेखाचे. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी जमीन खरेदीत गैरव्यवहार झाले आणि अवघ्या आठ मिनिटात दोन कोटींची जमीन साडेअठरा कोटी रुपयांना राम मंदिर उभारणार्‍या ट्रस्टने विकत घेतली असा नुकताच आरोप झाला आहे. त्या संदर्भात सामनाने याप्रकरणाची खुलासेवार चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली. त्याला आक्षेप घेऊन हा रामाचा अवमान आहे आणि तो सहन केला जाणार नाही, असे म्हणून त्याच्या विरोधात मोर्चा काढायचे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठरवले. गेली काही दशके कधीही न तुटणार्‍या आघाडीतील हे दोन महत्त्वाचे पक्ष हिंदुत्वाच्या प्रश्‍नावर एकत्रित आले होते आणि ते कधीही वेगळे होणार नाहीत असे यांची आघाडी 1989 मध्ये झाली तेव्हापासून मानले जात होते. अगदी अलिकडेपर्यंत ती सुरू होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहाय्याने शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मिळवले आणि भाजपाला बाजूला ठेवले. त्याआधी 2014 च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेचे सरकार राज्यात असले तरी त्यांनी निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. या काळातही त्यांच्यातील संघर्ष काही लपून राहिलेला नव्हता. सत्तेत असून विरोधी पक्षाची वर्तवणूक शिवसेनेने कायम ठेवली होती आणि त्याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत युती तुटण्यात झाले. यात सर्वांत मोठा भाजपा बाजूला राहिला आणि कधी नव्हे अशी अभूतपूर्व आघाडी महाराष्ट्राने पाहिली. या पार्श्‍वभूमीला अजून काही तपशील जोडले तर या दोन पक्षांतील संघर्ष अधिक स्पष्ट होऊ शकतो. तो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सुषमा स्वराज यांचे नाव पुढे केले होते आणि त्यावेळी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील अशी कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर भाजपाला बहुमत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेवर आले त्यावेळी शिवसेनेला एकच जागा देऊ केल्याने संघर्ष घडला होता. नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणे हे धोरण शिवसेनेने कायम राबवले. आता जो संघर्ष सुरू आहे त्याला राम मंदिरातील कथित घोटाळ्याचे निमित्त असले तरी ते देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीचे कारण आहे. मात्र या निवडणुकीत आत्ता जे दृश्य दिसले त्यापेक्षा अत्यंत वेगळे दृश्य दिसू शकते. शिवसेना-भाजप हे एकत्रित येऊन ही निवडणूक लढवू शकतात. कारण शिवसेनेला मुंबई महापालिकेवरची सत्ता कोणत्याही परिस्थितीत जाऊ द्यायची नाही व कोणत्याही परिस्थितीत ती टिकवायची आहे. त्यासाठी ते गरज भासल्यास भाजपशी युती करू शकतात. परंतु त्याआधी मागच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा शिवसेनेने केलेल्या प्रकाराचे उट्टे काढण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी हे तंत्र वापरले जात आहे. शिवसेनेने आपला मतदार टिकवला मात्र शिवसेनेची धोरणे प्रादेशिक अस्मितेची आहेत. भाजपा राष्ट्रीय पक्ष असल्याने त्याला ती अडचणीची ठरतात. त्याच्यामुळेही युती असतानाच्या काळातही या दोन पक्षांमधील तणाव कायम राहिला आणि वाढला देखील. म्हणून येत्या फेब्रुवारीमध्ये होणार असलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कोणती युती आकार घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे दीर्घकाळ नियंत्रण आहे आणि त्याचबरोबर मुंबईतील अनेक पायाभूत सुविधांबद्दल लोकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ही सत्ता टिकवणे शिवसेनेला सोपे जाणार नाही. फक्त त्यासाठी शिवसेना कुठल्या पातळीवर जाऊन तडजोड करायला तयार होईल हे पाहायला हवे. त्याचबरोबर मुंबईत झालेला लोकसंख्यात्मक बदल लक्षात घेता तेथे प्रादेशिक अस्मितेऐवजी भाजपाचा सर्व प्रादेशिकता एकत्र आणण्याचे धोरण अधिक परिणामकारक ठरू शकते. मात्र त्यासाठी कशी आखणी होते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. म्हणूनच या निवडणुकीत हे दोन पक्ष एकत्रित आले तर आश्‍चर्य वाटायला नको. आता त्याच्यामध्ये मोठा भाऊ कोण हे ठरविण्यासाठी हा सध्याचा संघर्ष सुरू आहे.

Exit mobile version