मच्छीमारांना सॅटेलाइट फोनची सुविधा; खराब हवामानातही संपर्क कायम
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी तसेच हवामान आणि सुरक्षा विषयक सूचना वेळेवर मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासनाने सॅटेलाइट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘मच्छीमार सुरक्षा प्रथम’ या धोरणाअंतर्गत समुद्रातील संप्रेषण अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर आहे. सॅटेलाइट फोनमुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या खोल समुद्रातील भागातही मच्छीमारांचा किनाऱ्याशी अखंड संपर्क राहणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मागविणे शक्य होणार आहे.
बीएसएनएलच्या माध्यमातून ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिसचे सादरीकरण करण्यात आले असून या तंत्रज्ञानाची कार्यपद्धती, कव्हरेज, उपकरणांची वैशिष्ट्ये आणि खोल समुद्रातील उपयुक्तता याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. बीएसएनएलच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यामुळे समुद्रातील सुरक्षा, संप्रेषण आणि बचावकार्य अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी मच्छीमारांना तात्काळ मदत मागविता येणार आहे. तसेच हवामानातील बदल आणि सुरक्षा इशारेही वेळेवर मिळणार असल्याने अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल. या निर्णयामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचा आत्मविश्वास वाढेल आणि मत्स्यव्यवसाय अधिक सुरक्षित, आधुनिक व तंत्रज्ञानाधारित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या निर्णयाचे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष आणि मुरूड सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी स्वागत केले असून, मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
