पालकमंत्र्यांची मेहेरनजर, शासकीय निधीचा चुराडा
। रोहा । प्रतिनिधी ।
रोह्यातील शंभर वर्षांहून जुन्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रादेशिक पर्यटन योजनेतून एक कोटी सात लक्ष रुपयांचा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देत असल्याची माहिती शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. पण केवळ 675 चौरस फूट जागेवर होऊ घातलेल्या या मंदिरासाठी पालकमंत्र्यांनी केलेली कोटीची उड्डाणे ऐकून उपस्थित पत्रकारांचे डोळे विस्फारले आहेत.
रोहा शहराच्या विकासासाठी निधीची कमी कधीच पडली नाही. किंबहुना काही कोटी रुपयांचा निधी आणला नाही तर कामच होणार नाही अशी रोह्यातील एकंदर परिस्थिती आहे. मागील पंधरा वीस वर्षांत कोट्यावधी रुपये डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या उभारणी, दुरुस्ती, सुशोभीकरण या कामात खर्च झाले होते. सदर सभागृहाची 20 कोटी रुपये खर्चून नव्याने उभारणी करण्यात येणार असल्याची घोषणा खा. सुनिल तटकरे यांनी नुकतीच केली आहे. पण कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या सभागृहाची विल्हेवाट लावताना मात्र जेमतेम चाळीस लाख रुपये शासन दरबारी जमा होणार आहेत.
रोह्याचा मुख्य चौक अशी ओळख असणार्या राम मारुती चौकात उभ्या असलेल्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी एका खाजगी आर्किटेक्ट कडून प्राथमिक स्वरूपात डिझाइन तयार करण्यात आले आहे. जुन्या पद्धतीच्या या कौलारु मंदिरासाठी तीन टप्प्यात कौलारू कळसाचे काम होणार असून जीर्णोद्धार करताना मंदिराच्या बांधकामातील जुने दगड, लाकूड यांचा देखील पुनर्वापर होणार आहे. मारुती मंदिराच्या एका भिंतीवर बाहेरच्या बाजूस असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर, पांडुरंगशास्त्री आठवले आणि डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे शिल्प सदर जागेवर जपले जाणार असून मंदिरातील हनुमंताची मूर्ती देखील हलवली जाणार नसल्याचे याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
रोहा शहरात शासकीय निधीतून होत असलेल्या विविध विकासकामांसाठी खाजगी आर्किटेक्ट किंवा संस्था यांच्याकडून अहवाल तयार केले जातात. प्रकल्प अहवालाची किंमत जेवढी जास्त तेवढा जास्त मोबदला या खाजगी मंडळींना देण्यात येतो. मारुती मंदिराचे डिझाइन तयार करणार्या संबंधित आर्किटेक्टला देखील लाखो रुपयांची बिदागी याच एक कोटी सात लाख रुपयांमधूनच देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोणत्याही धर्माची प्रार्थनास्थळे हा आस्थेचा आणि भावनेचा विषय आहे. त्याला विरोध नाही. पण भावनेच्या आणि आस्थेच्या आड शासकीय निधीचा किती चुराडा करायचा यावर देखील विचार होणे गरजेचे असल्याचे मत रोह्यातील सूज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.