पोलादपूरसाठी पर्यटन विभागातर्फे दहा कोटींचा निधी

पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची माहिती
। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासकामासाठी पर्यटन विभागातर्फे तब्बल दहा कोटी रूपयांचा विकासनिधी आगामी काळात खर्च होणार असून, यामध्ये घागरकोंडचा झुलतापूल, साखर येथील नरवीर सुर्याजी मालुसरे समाधी आणि उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण यांचा समावेश असून ब्रिटीशकालीन हिलस्टेशन उल्लेख असलेल्या कुडपणसाठी लवकरच अधिकृत दौरा करून विशेष भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री ना.अदिती तटकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.
पोलादपूर तालुक्यातील उमरठ या गावातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे लोकार्पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आल्यानंतरही उमरठच्या विकासासाठी आतापर्यंत पर्यटन विकासासाठी 5 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून पोलादपूर तालुक्यातील नरवीर सुर्याजी मालुसरे स्मृती स्थळ विकासित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून मागणी होत असल्याने या कामासाठी 2 कोटी 22 लाख तसेच 22 जुलै 2021 रोजीच्या अतिवृष्टीमुळे पोलादपूरच्या वर्षा पर्यटनाचे खास आकर्षण असलेल्या घागरकोंड येथील झुलत्या पुलासाठी 2 कोटी 79 लाख रूपयांचा निधी प्रादेशिक पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे, असे यावेळी राज्याच्या पर्यटनराज्य मंत्री ना.अदिती तटकरे यांनी सांगितले.
पर्यटन दिनानिमित्त यासंदर्भात अधिकृत निर्णय महाविकास आघाडीसरकारच्या माध्यमातून घेतल्यानंतर पोलादपूर तालुक्यासाठी उमरठ, साखर आणि घागरकोंड बोरावळेप्रमाणेच कुडपण येथे हिलस्टेशन तसेच महावीरचक्रप्राप्त कृष्णा सोनावणे यांच्या वीरश्रीपूर्ण इतिहासाची साक्ष देणारे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार असून यासंदर्भात राज्याच्या पर्यटनराज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी स्वत: कुडपण परिसराचा पाहाणी दौरा करून राज्यसरकारकडून निधीची तरतूद करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना दिली.

Exit mobile version