। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (दि. 01) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये गृहप्रकल्पांसाठी आणि संरक्षण विभागासाठी मोठा निधी मंजूर केला आहे.
गृहप्रकल्पांसाठी नवा स्वामी फंड
पहिल्या फंडाच्या यशानंतर स्वामी फंड 2 ची घोषणा केली. गृहप्रकल्पांमधील एक लाख युनिट्स पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा नवा फंड तयार करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. ज्या घर खरेदीदारांच्या घराचा ताबा अडकला आहे, त्यांना दिलासा देणं हा या योजनेचा उद्देश आहे. रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्राने स्वामी नावाच्या निधीची घोषणा केली होती. स्वामी 1 अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्पातील 50 हजार घरांचं काम पूर्ण झालं असून घर खरेदीदारांना चाव्या देण्यात आल्या आहेत. यावर्षी आणखी 40 हजार युनिट्स पूर्ण होतील, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत होईल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. एकूण 15,000 कोटी रुपयांच्या या निधीत आणखी एक लाख युनिट्स जलद गतीनं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
संरक्षण विभागासाठी मोठा निधी
अर्थसंकल्पामध्ये संरक्षण विभागाला 36 हजार 959 कोटी रुपये वाढवून 4 लाख 91 हजार 732 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील बॅकलॉग भरुन निघणार असल्याचे म्हटले जात आहे. यंदा संरक्षण बजेटमध्ये 37 हजार कोटी रुपये वाढले आहेत. जे एकूण बजेटच्या 13.44 टक्के आहे. संरक्षण दलाचे आधुनिकीकरणाला आमचे प्राधान्य राहाणार आहे. यासाठी आम्ही निरंतर कार्यरत आहोत. यासाठी आमच्या सरकारने एक लाख 80 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्यामुळे सैन्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. यंदाच्या अर्थ संकल्पात डिफेन्स विभागासाठी तीन लाख 11 हजार कोटीहून अधिक रक्कम मिळणार आहे. जी गेल्यावेळी पेक्षा 10 टक्के जादा आहे. यामुळे डॉमेस्टीक डिफेन्स इंडस्ट्रीजला प्रोत्साहन मिळणार आहे. माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या उपचारासाठी 8300 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम मिळाली आहे.