सेव्ह खारघर मोहिमेला सुरुवात; पालिका आयुक्तांची घेतली भेट
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
अनेक शैक्षणिक संस्था असलेल्या खारघर शहरात देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असल्याने शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख निर्माण केलेल्या खारघर शहरात बार संस्कृती फोफावू लागली आहे. याला विरोध म्हणून मागील दोन दशके खारघर दारूबंदीचा लढा दिलेल्या संघर्ष समितीकडून पुन्हा एकदा दारूमुक्त खारघर ही मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सेव्ह खारघर मोहिमेला संघर्ष समितीने सुरुवात केली आहे.
पनवेल तालुक्यात सर्वात जास्त शाळा, महाविद्यालये खारघर शहरात असल्याने शैक्षणिक शहर म्हणून खारघरची ओळख निर्माण झाल्याने देशभरातून खारघरमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांना मद्यपानापासून दूर ठेवण्यासाठी खारघर ग्रामपंचायत माध्यमातून खारघर वसाहत दारूमुक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तशा प्रकारचा ठरावदेखील ग्रामपंचायती कडून घेण्यात आला होता. मात्र, 2016 साली खारघर वसाहतीचा समावेश पनवेल पालिकेत करण्यात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून खारघर वसाहतीत मद्य विक्री करणार्या दुकानांना परवानगी देण्यात आली. तसेच आणखी दारुविक्रीच्या दुकानांना, हॉटेल्स ना परवाणगी देण्याच्या तयारीत उत्पादन शुल्क विभाग असल्याने याला विरोध करण्यासाठी शहरातील महिला मंडळ, सामाजिक संस्था सक्रिय झाल्या आहेत.दि.29 रोजी शहरातील तेजस्विनी महिला मंडळ, पुरंदर स्नेह सामाजिक संस्था, इश फाउंडेशन,रॉबिनहूडआर्मी,माय मराठी महिला मंडळ,सेक्टर 11 महिला मंडळ, केरला समाज, सेक्टर 12 सीनियर सिटीजन ग्रुप, डॉक्टर असोसिएशन, सहयोगी सेवाभावी संस्था आदी सदस्यांनी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेत खारघर शहराला दारूमुक्त करण्याबाबत पालिकेने सहकार्य करण्याची विनंती केली. शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बॅनरबाजी करण्याचीदेखील परवाणगी यावेळी आयुक्तांकडे शिष्टमंडळाने केली आहे.
राजकारणी गप्प?
अनेक वेळा खारघरमध्ये दारूबंदीचा विषयावर राजकारण्यांनी रेटून नेला. शहरात निरसूख पॅलेस नावाने बार सुरु झाला तेव्हा भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन करीत या बारचे शटर बंद करीत आंदोलन पुकारले होते. त्यानंतर मात्र हा बार जोरात सुरु झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी काहीच हालचाल केली नाही, असा आरोप शहरातील नागरिक करीत आहेत.