अंबा नदीत अंत्यविधीचे साहित्य

आरोग्य धोक्यात, नागरिकांमध्ये घबराट
| सुधागड-पाली | वार्ताहर |

पालीतील अंबा नदी जॅकवेलजवळ नदीपात्रात शनिवारी (ता.26) चक्क कफन व अंत्यविधीचे साहित्य टाकल्याचे निदर्शनास आले. यामुळे नदीचे पाणी तर दूषित झालेच, मात्र नागरिकांमध्ये घबराटदेखील पसरली आहे. मागील महिन्यात अंबा नदीत मेलेल्या कोंबड्या टाकण्यात आल्या होत्या. तर, आता कफन आणि अंत्यविधीचे साहित्य आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. समग्र पालीकरांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. जॅकवेलमधून पाणी काढून हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट जलवाहिन्यांद्वारे पालीकरांना पुरविले जाते. परिणामी, रोगराई पसरण्याचा धोकादेखील आहे. मंजूर झालेली तब्बल 25 कोटींची शुद्ध पाणी योजना मागील अनेक वर्षांपासून लालफितीत अडकली आहे. वारंवार अंबा नदीचे पाणी दूषित होत असल्याने शुद्ध पाणी योजना कार्यान्वित करावी, अशी मागणीदेखील नागरिक करत आहेत.

अंबा नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. नगर पंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे. जे कोणी असा प्रकार करत आहेत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित करण्यात यावी. – राजेश काटकर, सामाजिक कार्यकर्ते, पाली

या ठिकाणची ताबडतोब स्वच्छता करण्यात येईल. याशिवाय दर दोन दिवसांनी येथे स्वच्छता करण्यासाठी माणसे नेमण्यात येतील. – सुलतान बेनसेकर, सभापती, पाणीपुरवठा

Exit mobile version