मोडी लिपी वाचकांभावी जात वैधता प्रमाणपत्र रखडले
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयीन प्रवेशासाठी अत्यंत आवश्यक असणारे जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यात प्रशासकीय त्रुटींमुळे प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. 50 वर्षांपूर्वीचे जुने जन्म-मृत्यूचे अनुसूचित जातीत असल्याचा पुरावा दर्शवणारे महसुली दस्तावेज केवळ मोडी लिपीत उपलब्ध आहेत. मात्र, सुधागड तहसीलदार कार्यालयाकडे हक्काचा ‘मोडी लिपी वाचक’ उपलब्ध नसल्याने शेकडो गरीब व वंचित विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. या गंभीर समस्येकडे शासन आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त करत बहुजन विद्यार्थी संघटनेने बुधवारी (दि.24) निवासी नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले.
सध्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, अनुसूचित जाती आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. अलिबाग येथील जात वैधता कार्यालय समाज कल्याण विभागाकडून 50 वर्षांपूर्वीचे जुने पुरावे मागवले जातात. हे जुने महसुली व कुळ वहिवाट विभागातील रेकॉर्ड्स केवळ मोडी भाषेत उपलब्ध आहेत. हे दस्तावेज वाचून त्याचा अधिकृत अनुवाद करून देणारे तज्ज्ञ वाचक शासकीय पातळीवर उपलब्ध नसल्यामुळे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘सरकार आणि प्रशासनाला बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची काहीही चाड उरलेली नाही’, असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी व निवेदनकर्त्यांनी यावेळी केला. तसेच प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एकाही विद्यार्थ्याचे डमिशन रद्द झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष निशांत पवार, सुशिल गायकवाड, अक्षय गायकवाड, चेतन भालेराव, सुरेश गायकवाड, निसार चौधरी, मिलिंद शिंदे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने वेळीच पावले न उचलल्यास विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
तहसीलदार कार्यालयामार्फत मोडी वाचक उपलब्ध करून घेण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. या समस्येबाबत आणि मोडी लिपी वाचकांच्या कमतरते बाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर सविस्तर अहवाल पाठवून कळविले आहे.
भारत फुलपगारे
नायब तहसीलदार, सुधागड-पाली
