गजगे यांचा उपोषणाचा इशारा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडमधील सुधा गॅस वितरण व्यवस्थाला प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या मुदतीत भरलेल्या 27 लाभार्थ्यांचे फॉर्म भरुन सुध्दा या योजनेचा लाभ न मिळाल्यामुळे दि. 20 मे पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा साकीब गजगे यांनी दिला आहे.

गजगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनामार्फत महीलांना मोफत गॅस बाटला मिळण्यासाठी शासनाची पी.एम. उज्वला योजना राबविण्यात आलेली होती. या योजनेचा लाभ घेण्याकरता आगरदंडा येथील कॉमन सर्व्हिस सेंटर येथे दि.12 फेब्रुवारी रोजी 14 लाभार्थ्यांचे तर दि. 26 फेब्रुवारी रोजी 13 लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज गॅस ऑफीसमध्ये जमा केले होते. त्याची पोच प्रत माझेकडे आहेत. कार्यालयात या अर्जाबाबत वारंवार विचारपूस केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे.

तरी, या 27 लाभार्थ्यांचे फॉर्म मुदतीत भरलेले असुन त्यांना शासनाच्या या योजनेचा लाभ न मिळाल्यास कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसेन असा इशारा निवेदनाद्वारे साकीब मुश्ताक गजगे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी-रायगड अलिबाग, पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग, मुरुड तहसिलदार, पोलीस निरिक्षक यांना माहिती सादर करण्यात आल्या आहेत.

याबाबत सुधा गॅस वितरण व्यवस्था मुरूड यांच्या कार्यालयाशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. परंतु, आचारसंहिता संपल्यावर लाभ मिळेल.

समीर उपाध्ये, मॅनेजर,
सुधा गॅस वितरण व्यवस्था, मुरूड-जंजिरा
Exit mobile version