गणा धाव रे.. मला पाव रे.. पारंपारिक लोककलांना जनाधार

गणेशोत्सवानिमित्त तालीम सुरू

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. विशेषत: कोकणात दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, कीर्तन आणि जाखडी नृत्य किंवा बाल्या नाच या लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस येतांना दिसत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात गावा-गावांत लोककलांची रंगित तालीम सुरू झाली आहे.

श्रावणात महिलांचे मंगळगौरी खेळ, भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सव यामध्ये देखील कोकणातील प्रत्येक गावात पारंपारिक लोककला सादर होत असते. मात्र, सध्या नोकरीनिमित्त शहराकडे आलेला चाकरमानी या कलेपासून दुरावला आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यातील श्री दत्त गुरु नाच मंडळ यांचा जाखडी नाच गेली 22 वर्ष बंद होता. मात्र, येथील नवतरूणांनी तो पुन्हा चालू केला आहे. चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने नृत्य कलाकारांची जमवाजमव सुरू केली आहे. ही कोकणातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी हे मंडळ तत्पर झाले आहे. यावेळी पारंपरिक जाखडी नृत्याचा बाळकूम येथील मरू आईच्या मंदिरात शुभारंभ करण्यात आला. दर शनिवार-रविवार या मंडळाची रंगीत तालिम या ठिकाणी सुरू असते. तर, ठाणे आणि भिवंडीमध्ये पुंडलिकबुवा मोरे यांच्या माध्यमातून नवीन होतकरू कलाकार मंडळींना तेजस मोरे आणि सौजस मोरे हे लोकसंगिताचे धडे देत आहेत. गावची कलाकार मंडळी फावल्या वेळात जाखडी नृत्य, शक्ती तुरा, भजन कीर्तन यात दंग होत आहेत. खरंतर लोककला जपणे आणि आपली संस्कृती टिकवणे यासाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेतात. विषेश म्हणजे त्याच्यात मुलींचा सुद्धा सहभाग आहे.

लोककला टिकवण्यासाठी तरुणांचा पुढाकार
आधुनिकतेच्या युगात समाजामध्ये बाल्या नाच आणि माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. तरुण पिढीने याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ही लोककला आता लोप पावत चालली आहे. आपल्या पुर्वजांची हि कला टिकावी, तिचे जतन व्हावे यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षीत तरुण मागील अनेक वर्षापासून स्वतः हि कला सादर करुन जोपासत आहेत. यातील अनेक तरुण पदवीधर आहेत. तर, कोणी इंजिनियर देखिल आहेत. मात्र, प्रत्येकजण तनमनधनाने कोणताही संकोच न बाळगता हि कला सादर करतात व त्यासाठी मेहनत घेत आहेत.

आपल्या भावी पिढीला ही कला समजावी व त्यांनी देखील हि पारंपरिक कला अधिक समृद्ध करावी. त्यासाठी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मागील 15 वर्षांपासून बाल्या व माळी नाच ही कला जतन करत आहोत. गावातील सर्व ग्रामस्त आम्हाला प्रोत्साहन देऊन सहकार्य करतात. पारंपारीक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. गणेशोत्सव निमित्त सराव सुरू केला आहे.

समाधान म्हात्रे,
तरुण कलाकार, दुरशेत

Exit mobile version