अवघा रायगड झाला गणेशमय

विघ्नहर्त्याचे जल्लोषात स्वागत; दीड दिवसांच्या बाप्पांचे उत्साहात विसर्जन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात, पावसाच्या जलधारांच्या संगतीत रायगडात शुक्रवारी 1 लाख 82 हजार लाडक्या गणरायांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे सारे वातावरण गणेशमय होऊन गेलेले आहे. दरम्यान, दीड दिवसांच्या बाप्पांना शनिवारी संध्याकाळी पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात निरोप देण्यात आला.

यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट कायम राहिल्याने सरकारने दिलेल्या नियमावलीत राहूनच गणेशभक्तांनी गणेशोत्सवास प्रारंभ केला आहे. पुढील दहा दिवस आता सारे वातावरण गणेशमय होऊन जाणार आहे. दरम्यान, रविवारी ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे.त्यासाठी आवश्यक त्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती.

प्रशासनातर्फेच विसर्जन
गणेशमुर्तींच्या विसर्जनासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.अलिबाग समुद्रकिनारी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी प्रशासनातर्फे चांगली सुविधा पुरविली आहे.समुद्रकिनारी विसर्जनासाठी येणार्‍यांना किनार्‍यावर सोडले जात नाही.त्यांच्याकडील मुर्ती नपातर्फे संकलित करुन त्या विसर्जित केल्या जात आहेत.तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्यावतीने विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.

Exit mobile version