आगरदांडा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना मुरुड तालुक्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणार्या चित्रशाळांतून लगबग सुरु झाली आहे. यंदा जीएसटीचा मोठा फटका मूर्तीकारांना बसणार आहे. जीएसटीमुळे शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे मूर्तीच्या किमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे जेवढ्या रकमेची मूर्ती, त्याप्रमाणात जीएसटी रकमेचा बोजा यंदा गणेशभक्तांना सहन करावा लागणार आहे.
मूर्ती बनविण्यासाठी लागणार्या शाडूच्या मातीच्या किमतीत अगोदरच दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात जीएसटीमुळे रंग साहित्य, प्लास्टर ऑफ पॅरिस व अन्य साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. मजुरीच्या दरात वाढ झाली असली तरी मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. सतत पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडला आहे. केवळ कलेची असलेली आवड जोपासण्यापुरताच हा व्यवसाय उरला असल्याची खंत कारखानदार व्यक्त करीत आहेत.
महागाईमुळे विक्री मंदावली
शाडूच्या मातीपासून बनविण्यात येणार्या मूर्त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, या वाढत्या महागाईचा फटका गणेशभक्तांना सहन करावा लागत आहे. नेमकेच कारखानदार सध्या गणेशमूर्ती घडवण्याचे काम करीत आहेत. त्यातच मूर्तींच्या वाढत्या किमतींमुळे विक्रीचे प्रमाण मंदावल्याने याचा फटका कारखानदारांना बसला आहे.
चांगले कलाकार मिळणे दुरापास्त
मुरूड तालुक्याच्या गावोगावी साठ ते सत्तर गणेश मूर्तीकारांच्या चित्रशाळा असून, माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत त्यांना स्वतःसह कुटुंबियांना सर्व कामे करावी लागतात.चांगले कलाकार कामगार म्हणून मिळणे दुरापास्त झाले आहे. वाढत्या किमतीमुळे मूर्तींचा आकारही लहान झाला आहे. निरनिराळेदेखावेही कमी झाले आहेत.