जिल्ह्यात माघी गणेशजन्मोत्सव उसाहात

बुधवारी माघी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पा मोरयाचा गजर ऐकू आला. पहाटेपासूनच पूजाविधीला प्रारंभ झाल्याने गणेश दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरयाचा होणारा गजर, गणपती अथर्वशीर्ष पठणाचा गुंजणारा स्वर, आकर्षक रांगोळ्या आणि गणेश आरतीच्या मंगल सुरावटींनी भक्तीमय झालेल्या वातावरणात माघी गणेश जन्मोत्सव सोहळा रायगड जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी एक असलेला पालीचा बल्लाळेश्‍वर, महडचा वदरविनायक, चिरनेरचा महागणपती आदींसह ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून गणेशमूर्तींची आकर्षक पूजा हे गणेश जयंतीचे वैशिष्ट्य ठरले.

श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात माघी गणेश जयंती निमित्ताने बुधवारी लाखो भाविकांनी प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रात्री 1 वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावेळी प्रथम श्री महागणपतीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. श्रींच्या दर्शनासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उरण, पनवेल, पेण तसेच अन्य भागातून आलेल्या लाखो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.त्यामुळे संपूर्ण चिरनेर गाव भाविक भक्तांनी फुलून निघाले होते. भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयीसुविधा मिळून, रांगेत दर्शन घेता यावे, वाहतूक कोंडी होऊ नये, गणेश भक्तांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय व्हावी त्याचबरोबर कोणताही अनुचित आणि उत्सवाला गालबोट लागणारा प्रकार घडू नये यासाठी चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून कडक बंदोबस्त आणि आवश्यक सुसज्ज नियोजन करण्यात आले होते.

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव उत्साहात
दैवज्ञ समाज गणेश मंदिर ट्रस्ट म्हसळा यांच्या विद्यमाने म्हसळा येथील श्री गणेश मंदिरात सालाबाद प्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत 25 जानेवारी रोजी पहाटे सहा वाजता श्रींची अभिषेक पूजाविधी, दैवज्ञ समाज महिला मंडळ यांचे संगीत भजन, सिद्धीकला भजन मंडळाचे संगीत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सुनिल उमरोठकर यांनी सांगितले. माघी गणेशोत्सवानिमित्त रोहा येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार मंदार भावे यांचे उपासना, बालोपासना आणि मनोपासना तसेच श्री गणेश यांच्या जन्मोस्तवावर आधारीत सुस्वर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुनील उमरोठकर, अनिल पोतदार, नंदू गोविलकर, गौरव पोतदार, सुरेश कुडेकर, सुशील यादव , महेंद्र पोतदार, गौरी प्रसाद, प्रसाद पोतदार, संपदा पोतदार, दादा पानसरे, महादेव कदम,अनिकेत पानसरे, धारिया आदि मान्यवर उपस्थित होते.


मुरुडमध्ये होमहवन
मुरूड- कुभांरवाड्यात संतोष दर्गे हे आपल्या निवासस्थानी असलेल्या मंदिरात गेली 23 वर्ष उत्सव साजरा करीत आहेत. शहरातील कुंभार वाड्यातील एकमेव ठिकाणी श्रीगणेश जयंती साजरी होत असल्याकारणाने शहरातील व पंचक्रोशीभागातील असंख्य श्री गणेशभक्त दर्शन करिता येत असतात. आणि उत्सव साजरा करत असतात. यावेळी श्री गणेशाची पूजन, अभिषेक, होम हवन करण्यात आले. सत्यम क्रीडा मंडळ कुंभारवाडातील सर्व पुरुष व महिलांचे सहकार्य लाभले.

Exif_JPEG_420


Exit mobile version