गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज

महाड-पोलादपूर बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने फुलल्या

| महाड | प्रतिनिधी |

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने महाड आणि पोलादपूरच्या बाजारपेठा गणेश सजावटीच्या साहित्याने बहरल्या आहेत. मात्र, वाढलेले इंधन व वाहतूक खर्च आणि बाजारातील चढ-उतारामुळे यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. तरीही गणेशभक्तांकडून आकर्षक व हटके सजावटीच्या साहित्याला चांगली मागणी आहे.

कागदी फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, तयार मखर, पाट, चौरंग, कापडी आरास, कागदी मुखवटे, पताका, झिरमिळ्या, छत्र, चक्र, मोरपीस आणि विविध प्रकारच्या लायटिंगने बाजारपेठ सजली आहे. मोत्यांच्या माळांचे दर 30 ते 350 रुपये, छत्र 90 ते 150, चक्र 60 ते 500, लायटिंग 100 ते 700 रुपये, तर तोरण सुमारे 150 रुपयांपासून उपलब्ध आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अनेक नागरिक घरच्या घरी सजावट करण्यासही प्राधान्य देत आहेत. कार्डशीटपासून मंदिर तसेच कापडी आरास तयार करण्याकडे कल वाढला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अगरबत्ती, धूपकांडी आणि कापूराची विक्रीही वाढली आहे. गुलाब, मोगरा, जुई, जास्वंद, चाफा यांसह आंबा, अननस, स्ट्रॉबेरी, चेरी अशा विविध सुगंधांच्या अगरबत्त्या बाजारात दाखल झाल्या आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरू तसेच स्थानिक उत्पादकांचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत.
महाड ही दक्षिण रायगडमधील प्रमुख बाजारपेठ असल्याने आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणावर ग्राहक येथे खरेदीसाठी येत आहेत. पोलादपूर बाजारपेठेतही सजावटीच्या साहित्याची दुकाने सजली असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

Exit mobile version