गणेशोत्सवाची उद्या मिरवणुकीने सांगता

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेले दहा दिवस उत्साहात सुरु असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची शुक्रवारी (दि.9) अनंत चतुर्दशीला मिरवणुकीने सांगता होणार आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकही सज्ज झाले आहेत. दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागला होता. पण यावर्षी ती कसर भरुन निघाल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसांपासून गणेशभक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. तो अखेरपर्यंत टिकला. आता अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. रायगडात 17,459 घरगुती तर 164 सार्वजनिक गणेशमुर्तीेचे विसर्जन केले जाणार आहे.

यासाठी पोलिसांसह सर्व शासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय समुद्रकिनारे, नदी आदी ठिकाणी लाईटची सोयही करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version