१२ ऑटो रिक्षा जप्त, ३ आरोपींना अटक
। माणगाव । सलीम शेख ।
मुंबई कनेक्शन असणार्या चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणार्या टोळीचा माणगावात पर्दाफाश झाला. माणगाव पोलिसांनी आरोपींकडून एकूण 12 रिक्षा जप्त केल्या असून माणगावमधील 1 व मुंबईतील 2 अशा एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी (दि.13) सकाळी 11:30 वाजता पत्रकार परिषदेत दिली. माणगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, माणगाव तालुक्यातील उतेखोलवाडी येथील प्रवीण प्रदीप मोने (वय 36) यांनी त्याच गावातील आरोपी अमित सुरेश बुटे (वय 36) यांच्याकडून जुनी रिक्षा घेतली होती. त्या रिक्षाबाबत प्रवीण मोने यांनी अमित बुटे यास रिक्षाचा नंबर व कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांनी रिक्षाची कागदपत्रे दिली नाही. तसेच तो संपर्क करण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे प्रवीण मोने यांनी पोलिसांत तक्रार दिली.
गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. यावेळी माणगावमधील आरोपी अमित सुरेश बुटे यास अटक केल्यावर त्याने साथीदार आरोपी योगेश फाटू गोरेगावकर उर्फ लारा (वय 39, रा.रबाळे नवी मुंबई), केतन राजू जाधव (वय 23, रा.साठेनगर नौसील नाका, रबाळे नवी मुंबई, मूळ रा.ऐरोली नवी मुंबई), अतिष दिलीप पाटील (वय 36, रा.राबाडे गाव नवी मुंबई) यांच्याबद्दल माहिती दिली. हे आरोपी अमित बुटे यास रिक्षा देऊन त्या माणगाव येथील लोकांना कागदपत्र व नंबर लवकर देतो, असे सांगून त्यांची फसवणूक करीत असे.
या गुन्ह्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत अमित बुटे, केतन जाधव, अतिष पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण किंमत 4 लाख 34 हजार मूळ किंमत 12 लाख एवढ्या किंमतीच्या 12 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर, पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर, पोलीस नाईक अल्पेश पवार, पोलीस शिपाई अनिल रिठे, पोलीस शिपाई अमोल पोंधे, पोलीस शिपाई नाथा दहिफळे, पोलीस शिपाई संजीव सुरवसे, पोलीस शिपाई निखिल सूर्ते यांच्या पथकाने केली.