| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील पालखुर्द गावामध्ये एका टपरीखाली लपवण्यात आलेल्या जवळपास 37 लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला.
अमली पदार्थ विक्रेत्यांचा कणा मोडून काढण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोहीम उघडली. याच मोहिमेमध्ये एकाच दिवशी नवी मुंबईतील 48 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी मारण्यात आल्या. तळोजा येथील पालेखुर्द या गावात धाडसत्रात जमिनीखाली ड्रममध्ये गाढून ठेवलेला 13 किलोग्रॅम वजनाचा 26 लाखांचा गांजा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. टपरीसारख्या दिसणाऱ्या या घरात पोलिसांना तब्बल 37 लाख 27 हजारांचा गांजा सापडला. मागील अनेक वर्षांपासून पालेखुर्द गावात भाड्याने राहणाऱ्या विक्रीत सामील असणाऱ्या या कुटुंबाचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील दुधारा येथील आहे. ही टपरी दिखाव्यासाठी आहे. टपरीआडून 50 वर्षीय सरीफुन्नीशा अब्दुलजलील खान ही महिला हा व्यवसाय चालवते. पोलीस पथकाने अचानक धाड मारल्यावर सरीफुन्नीशा हिच्याकडे सुरुवातीला खाटेवरील चादरीखाली पाच किलो वजनाचा गांजा सापडला. तिने हा गांजा मुंब्रा येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच तिची 25 ते 30 वर्षे वयाची दोन मुले यामध्ये मदत करतात. पोलिसांना एका प्लास्टिक ड्रमच्या खाली खड्डा दिसला. या खड्ड्याखाली असलेला ड्रम बाहेर काढल्यावर त्यात 13 किलो 164 ग्रॅम वजनाच्या गांजाचा साठा लपवलेला मिळाला.






