। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. एकता भरत पटेल (वय 23, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे मृत युवतीचे नाव असून ती लोहगावमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास दुचाकीस्वार एकता विश्रांतवाडीतून येरवडा कारागृहाकडे जाणार्या रस्त्याने निघाली होती. कॉमर झोन कंपनीजवळ महापालिकेच्या कचरा वाहतूक करणार्या डंपरने दुचाकीस्वार एकताला धडक दिली. या धडकेत ती खाली पडून चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डंपरचालक त्र्यंबक शेरखाने (वय 38, रा. औंध) याला अटक केली.