बंदीच्या आदेशानंतरही कचरा टाकण्याचे काम सुरूच

जासई-गव्हाण-वहाळ गावांतील नागरिकांमध्ये संताप
। उरण । वार्ताहर ।
उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी उरण-पनवेलच्या हद्दीत टाकण्यात येणार्‍या बेकायदा कचरा व डेब्रिजवर बंदी घालण्याचे आदेश देऊनही त्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि प्रशासनाच्याच काही भ्रष्ट अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळे जासई-गव्हाण-वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक आणि प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेला हजारो टन कचरा- डेब्रिज टाकण्याचे काम सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईतून दररोज हजारो टन कचरा-डेब्रिज जासई-गव्हाण-वहाळ ग्रामपंचायतींच्या हद्दीत बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असल्याने कचरा डेब्रिजचे 50 फूट उंचीचे डोंगर निर्माण झाले आहेत. या डेब्रिजमध्ये गटारातील घाण, मृत पशुपक्षी, प्राण्यांच्या अवयवांमुळे हवेतही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने वायुप्रदूषणात भर पडली आहे. परिसरात वाढते वायुप्रदूषण व दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुंबईतील दररोज येणारा हजारो टन कचरा- डेब्रिज उलवे नोड परिसरात आणखी बर्‍याच ठिकाणी हा धोकादायक कचरा-डेब्रिज कचरा टाकण्यात येत आहे. यामुळे खाड्याही बुजविण्यात आल्या आहेत. बामणडोंगरी खाडी, वहाळ हद्दीत तर चक्क खारफुटींवर हा कचरा टाकून कांदळवन नष्ट करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी डेब्रिज कचरा धुतला जातो आहे. डेब्रिज कचरा धुतलेले दूषित घाण पाणी थेट समुद्र, खाड्यात सोडले जात आहे. या दूषित पाण्यामुळे समुद्र, खाड्याही प्रदूषित झाल्याने येथील स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

या गंभीर प्रश्‍नाबाबत विविध वृत्तपत्रांतून वाचा फोडण्यात आल्यानंतर उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि संबंधित विभागाला तत्काळ वाहतूक करणार्‍या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. उपजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर काही दिवस कचरा-डेब्रिज टाकण्याचे काम बंद झाले होते. मात्र दोन दिवसांपासून तुरळक प्रमाणात तर शासकीय सुट्यांचा फायदा घेत डेब्रिज माफियांनी शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणावर कचरा-डेब्रिज टाकण्याचे काम सुरू केले आहे. या गंभीर प्रश्‍नावर संबंधित शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप येथील रहिवासी व मुंबई बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केला.

Exit mobile version