जगबुडी नदीत कचऱ्याचे साम्राज्य

मगरींच्या अधिवासाला धोका; क्रोकोडायल पार्कचे स्वप्न धूसर?

| खेड | प्रतिनिधी |

शहरालगतच्या जगबुडी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, रिकाम्या मद्याच्या बाटल्या, कॅरिबॅग आणि अन्य कचऱ्यामुळे नदीपात्राचे विद्रुपीकरण झाले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नदीतील जैवविविधतेसह मगरींच्या अधिवासालाही धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा तरंगताना दिसत असून, कुजणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शहरालगतच्या भागासह नदीकिनारी वसलेल्या भोस्ते, वेरळ आणि भरणे या गावांमधूनही नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी याच नदीपात्रात मगरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतरही प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून प्रभावी उपाययोजना झालेल्या नसल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. सध्या नदीपात्रातील मगरींची संख्या घटत असल्याने त्यांच्या अस्तित्वाबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

जगबुडी नदीपात्रात गेल्या दोन वर्षांपासून एका बाजूला गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे; मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने नदी स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकारकडून जगबुडी नदी पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही नदीपात्रात कचरा टाकण्यावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. जगबुडी नदीतील मगरींचे अस्तित्व आणि नैसर्गिक अधिवास जपण्याच्यादृष्टीने क्रोकोडायल पार्क उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे; मात्र, नदीपात्रातील वाढते प्रदूषण, कचऱ्याचे साम्राज्य आणि मगरींच्या अधिवासाला निर्माण झालेला धोका पाहता हे स्वप्न धूसर होताना दिसत आहे.

भरणे, वेरळ व भोस्ते या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो. तरी नदीपात्रात कचरा टाकू नये. यासाठी जनजागृती मोहीम व दंडात्मक कारवाई असे उपक्रम राबवण्याचा मानस आहे.

महादेव रोडगे,
मुख्याधिकारी, खेड

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी आणि नदीपात्राच्या नियमित स्वच्छतेसाठी प्रभावी यंत्रणा उभारावी.

सैफ चौगुले,
पर्यावरणप्रेमी, खेड
Exit mobile version