सूचना फलकाच्या खालीच कचरा; सिडकोच्या आदेशाला केराची टोपली

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील सिडकोच्या जागेवर कचरा टाकण्यास सक्त मनाई असताना व तशा प्रकारचे अधिकृत बोर्ड लावूनही ग्रामपंचायतमधील कचरा खुलेआम द्रोणागिरी नोड मधील रस्त्यावर टाकला जात आहे. सिडको फक्त नियमांचे सूचना फलक लावते. परंतु प्रत्यक्षात कारवाई मात्र कोणावरच करताना दिसत नाही. कारण अधिकारी वर्गाचे आर्थिक साटेलोट्यातूनच कारवाई होत नसल्याचे चर्चा जनतेत सुरू आहे.

या भागात सिडकोच्या माध्यमातून विकास केला जात आहे. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून विकास होण्याऐवजी भकासच जास्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये उभे राहणारे निकृष्ट दर्जाचे टॉवर, रस्त्यांचे व इतर सुविधांच्या कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. तर काही लाखोंची प्रत्यक्षात न होताच बिले पास केली जात आहेत. याबाबत सामाजिक संघटना, ग्रामस्थांनी लेखी तक्रारी करूनही सिडको प्रशासन कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत.

द्रोणागिरी नोडची निर्मिती करीत असताना या ठिकाणी मुख्य रस्त्यावर भर दिवसा कचर्‍याची रासच्या रास दिसते. यामुळे या परिसरातून येजा करताना नाक मुठीत धरून जावे लागते. या ठिकाणी कचरा ग्रामपंचायत मधून आणून टाकला जात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सदर जागा सिडकोच्या मालकीची असून या ठिकाणी घनकचरा टाकण्यास सक्त मनाई.

घनकचरा टाकणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. हुकुमावरून असा सुचनाफलक लावलेला असतानाही त्या सूचना फलकाच्या खाली व आजूबाजूला कचर्‍याची रासच्या रास पडलेली दिसत आहे. पण सिडको प्रशासनाने सूचना फलक लावण्यापलीकडे आजतागायत कोणावर साधी कारवाई केल्याचे दिसत नाही. सिडको प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभाराचा त्रास येथील जनतेला सहन करावा लागत आहे. याबाबत सामाजिक संघटना व ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी, निदर्शने करून प्रशासनावावर कोणताच परिणाम होताना दिसत नाही.

Exit mobile version