शाळांच्या आवारात वृक्षारोपण
| अलिबाग | प्रतिनिधी |
शालेयस्तरापासून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न परसबाग उपक्रमातून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला आहे. केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांच्या आवारात परसबाग तयार केली जाणार आहे. या परसबागांमधून उत्पादित केलेल्या भाजीपाल्याचा वापर शालेय पोषण आहारामध्ये केला जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बौध्दीक व शारिरीक क्षमता वाढावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आठवड्यातील एक वार दप्तराविना सुरु केला. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अन्य क्षेत्रातील आवड निर्माण व्हावी. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यामध्ये आता मोबाईलमध्ये रमणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात पिकांच्या लागवडीतून कृषीविषयक ज्ञान देण्याचा प्रयत्न सुरु केला जाणार आहे. रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने शाळेच्या आवारात परसबाग उपक्रम हाती घेतला आहे.
निसर्गाशी एकरुप व्हा!
जिल्हा परिषदेच्या दोन हजार 664 शाळा असून या शाळांमध्ये पहिली ते आठवीचे सुमारे 90 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परसबागेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाज्यांची, फळे, फुलांची ओळख होणार आहे. मोबाईल व ऑनलाईनच्या जगतामध्ये वावरणाऱ्या या विद्यार्थ्यांना निसर्गाशी एकरुप होण्याची सवय लागणार आहे.कृषीचे महत्व शालेय स्तरापासूनच समजणार आहे. याच परसबागेतील भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात दिला जाणार आहे. परसबाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांना कंपोस्ट, गांडूळ खत ही पर्यावरण पूरक खतांची माहिती मिळणार आहे. या उपक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषिशाळा, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकिय संस्था, सेंद्रीय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये परसबागा तयार करण्यात येणार आहेत. त्यापासून शालेय पोषण आहार देण्याचा एक प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना यातून घरगुती पौष्टीक आहार मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषि क्षेत्राबाबत आवड निर्माण होणार आहे.
पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद